सातारा : ‘सरकारने ५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांना कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. उसाची उपलब्धता आणि साखरेचे दर पाहता कारखाना सुरू होण्यापूर्वी कारखानदारांनी उसाला प्रतिटन एक रकमी ३५०० रुपये दर द्यावा तसेच मागील बिलापोटी ५०० रुपये द्यावेत अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करणार आहे,’ असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी पंजाबराव पाटील म्हणाले, ‘सर्वत्र दिवाळी झाली असली तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी मात्र दिवाळी झाली नाही. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या तोंडावर कारखानदारांकडून ऊस बिलापोटी हप्ता देण्यात येत असे; परंतु यावर्षी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि शेतकऱ्यांचा कळवळा असे म्हणणारे सरकारमध्ये सामील झाल्याने कारखानदारांनी यावर्षी दिवाळीपूर्वी हप्ता दिलेला नाही. यावर्षी ऊस कमी असून, गाळप करण्यासाठी कारखानदारांमध्ये चढाओढ सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत आणि एकत्र येऊन जोपर्यंत प्रतिटन ३५०० रुपये एक रकमी आणि मागील बिलापोटी ५०० रुपये प्रतिटन देत नाही, तोपर्यंत उसाला तोड देऊ नये. गेल्यावर्षी साखरेचे दर कमी असल्याचे सांगत दर कमी देण्यात आला. परंतु यावर्षी साखरेला दर असून, केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली तर आणखी साखरेचा दर वाढणार आहे. गुऱ्हाळामध्ये उसाला २८०० रुपये प्रतिटन रोख दर मिळत असून, कारखानदार तर उपपदार्थापासूनही पैसा मिळवतात त्यामुळे ३५०० रुपये दर देण्यास काही अडचण नाही. (प्रतिनिधी) ..तर फिरू देणार नाही.! जर कारखानदारांनी दर जाहीर केला नाही तर कारखानदारांचे अध्यक्ष आणि मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही त्याचप्रमाणे गनिमी काव्याने आंदोलन करण्यात येईल.’ याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आले आहे.
पहिली उचल जाहीर करावी
By admin | Published: November 03, 2016 11:52 PM