कोरेगाव : मजबूत व देखभाल विरहित तंत्रज्ञान असलेल्या लिथली आर्च पद्धतीने मोठ्या प्रमाणावर पुलांची निर्मिती केली जाते. आशिया खंडात त्याच्या वापराचा निर्णय झाला असून, पहिला मान कोरेगाव तालुक्याला मिळाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला बुधवारी पश्चिम महाराष्टÑातील उच्चपदस्थ अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी केली. हे तंत्र आत्मसात करण्यासाठी सकाळपासून शेकडो अभियंते कोरेगावात होते.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कोरेगाव शहरात केदारेश्वर मंदिरानजीक तीळगंगा नदीवर नव्याने दोन पुलांची उभारणी केली जात आहे. या पुलाच्या कामासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील अंतर्गत दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पूल मजबूत होणे गरजेचे असल्याने येथे चांगले तंत्रज्ञान वापरले जावे, यासाठी आमदार शिंदे हे प्रयत्नशील होते. अधीक्षक अभियंत्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून वरिष्ठांशी चर्चा केली आणि त्यातून युरोपसह जगातील अन्य खंडांमध्ये लोकप्रिय असलेल्या लिथली आर्च पद्धतीचा वापर करण्यावर एकमत झाले आणि त्यास परवानगी घेण्यात आली. कोरेगावातील पुलाचे काम नागपूरच्या कंपनीकडून असल्याने त्यांच्याशी समन्वय साधून या पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात झाली. पुलाचे काम निम्मे झाले असून, पाच जिल्ह्यांच्या उच्चपदस्थ अभियंत्यांनी या कामास भेट दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, सहायक मुख्य अभियंता जे. डी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता संभाजी माने, सदाशिव साळुंके, राजेश पाटील, कार्यकारी अभियंता लक्ष्मण वाघमोडे, संजय सोनावणे, उपअभियंता राहुल अहिरे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र नवाळे यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता उपस्थित होते. आर्च इन्फ्रा या ठेकेदार कंपनीचे चेतन पवार व राजू शहाडे यांनी अभियंत्यांना या तंत्रज्ञानाची माहिती दिली.लिथली आर्च पद्धतीला १२० वर्षांचे आयुर्मानकोरेगावात वापर करण्यात येत असलेल्या लिथली आर्च पद्धतीला सुमारे १२० वर्षांचे आयुर्मान आहे. कोणत्याही प्रकारचे स्टील न वापरता हा पूल बांधला जात असून, त्याला भविष्यकाळात देखभाल दुरुस्तीची आवश्यकता राहत नाही. या पुलाचे काम म्हणजे माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे, अशी प्रतिक्रिया उपअभियंता राहुल अहिरे यांनी दिली.
कोरेगाव मतदारसंघातील जनतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून दर्जेदार विकासकामे करण्याचे अभिवचन मी दिले आहे. पालकमंत्रिपदावर असताना शहरातील केदारेश्वर मंदिरानजीक नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता, तशी त्यास मान्यता देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने लिथली आर्च पद्धतीचा वापर केल्याने, हे काम दर्जेदार होणार आहे. या विभागाला मी धन्यवाद देतो.- शशिकांत शिंदे, आमदार