कोरोनाच्या महामारीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आता कृष्णा कारखान्यात संघर्ष करण्यासाठी रणांगणात उतरले आहेत. दुसरीकडे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते गेल्या वर्षभरात कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत घरातच बसून कृष्णा मेडिकल ट्रस्टला लक्ष्य करत आहेत. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनीही संस्थापक पॅनलची पुनर्बांधणी करून सहकार पॅनलला आव्हान दिले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. सध्याही कऱ्हाड आणि वाळवा तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख वाढतच आहे. कृष्णा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. सुरेश भोसले यांनी तिकडे लक्ष घातले होते. आता कृष्णा कारखान्याची रणधुमाळी सुरु झाल्यावर त्यांनी पुत्र डॉ. अतुल भोसलेंसह वाळवा व कऱ्हाड तसेच कडेगाव तालुक्यात संपर्क वाढवला आहे. गेल्या पाच वर्षांत कारखाना सक्षम केल्याचा दावा ते करत आहेत.
रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते एकाकी खिंड लढवत आहेत. मागील निवडणुकीत त्यांच्या जोडीला माजी अध्यक्ष मदनराव मोहिते होते. ते आता भोसले यांच्या सहकार पॅनलमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सोशल मीडियावरुन प्रचाराचा धुरळा उडवला आहे. त्यांनी कारखान्याच्या स्थापनेपासून सध्याच्या परिस्थितीपर्यंत आवाज उठवला आहे. संस्थापक यशवंतराव मोहिते यांनी उभ्या केलेल्या सहकारी संस्थेचा सात-बारा सभासदांपुढे मांडत सहकार पॅनलच्या त्रुटी मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्जही भरले आहेत. राष्ट्रवादीची ताकद मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात संपर्क वाढवला आहे. सहकार पॅनलला आव्हान देण्याच्या तयारीत ते आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रयत पॅनल आणि संस्थापक पॅनल एकत्र आले तर सहकार पॅनलला आव्हान उभे राहणार आहे. परंतु, दोन्ही पॅनलमधून एकास एक उमेदवार निवडण्याचे आव्हान डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्यापुढे उभे राहणार आहे.
- अशोक पाटील, इस्लामपूर