मलकापूर : सध्या संपूर्ण देशात कोरोनावर मात करण्यासाठी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचा लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र उभारुन लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पद्धतीने पालिकेच्या पुढाकाराने मलकापूर शहरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना बुधवार, ७ एप्रिलपासून प्रत्येक बुधवारी लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मलकापूर शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याकरिता येथील भारती विद्यापीठ विधी महाविद्यालयात बुधवारपासून पहिले लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या लसीकरण केंद्रामध्ये आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी लसीकरण होणार आहे. प्रभागनिहाय आशा सेविकांच्यामार्फत प्रत्येक प्रभागातील १५ नागरिकांच्या नावाची लसीकरणाच्या अगोदर एक दिवस नोंदणी करण्यात येणार असून, यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड व मोबाइलची आवश्यकता लागणार आहे. याशिवाय संबंधित लाभार्थ्यास लसीकरणासाठी नावाची नोंदणी करता येणार नाही. लस घेणाऱ्या लाभार्थ्याने उपाशी पोटी येवू नये, तसेच ज्या नागरिकांना उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक, दमा, कॅन्सर इत्यादी आजार आहेत, त्यांनी याबाबतची कल्पना लसीकरण केंद्रामध्ये द्यावी. शहरातील ४५ वर्षांवरील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण खबरदारी पालिकेने घेतलेली आहे. याकरिता प्रभाग अध्यक्ष, नोडल अधिकारी व आशा सेविकांची मदत घेतली जाणार आहे.
मलकापूर शहराचा विस्तार विचारात घेता राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्व-पश्चिम बाजूस लसीकरण केंद्र कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे मलकापुरातील उपकेंद्र व पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे लसीकरणाचे नियोजन केले आहे. मलकापूर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता लसीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण होण्याकरिता प्रतिदिनी लस देण्यासाठी दुसरे लसीकरण केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दैनंदिन लस उपलब्ध होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन मलकापूरच्या नगराध्यक्ष निलम येडगे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण व मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी केले आहे.