मसूर : कराड तालुक्यातील शिरवडे - तासवडे दरम्यान कृष्णा नदीवर झालेल्या नवीन उंच पुलावर धोकादायक पद्धतीने सध्या मासेमारी सुरू आहे. मासेमारी करणाऱ्यांच्या गळाला मासा लागेल का नाही माहीत नाही. पण ज्या पद्धतीने ही मासेमारी सुरू आहे, त्यामुळे त्यांचा जीव मात्र टांगणीला लागेल अशी भीती व्यक्त होत आहे.गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वी शिरवडे तासवडे दरम्यान वाहणाऱ्या कृष्णा नदीवर माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने दळण वळण सुलभ व्हावे यासाठी उंच मोठा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून सह्याद्री साखर कारखान्याकडून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणे सुलभ झाले आहे. शिरवडे-तासवडेसह परिसरातील अनेक गावांची दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण झाली आहे. तसेच महामार्गाला जोडणारा जवळचा मार्ग झाल्याने प्रवासी व वाहनधारकांना सोयीचा रस्ता उपलब्ध झाला आहे.अलीकडे या पुलाच्या संरक्षक कठड्यावर धोकादायक पद्धतीने उभे राहून मासे पकडण्यासाठी गळ टाकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गळ टाकताना किंवा मासा गळाला लागला की काय हे पाहण्यासाठी हे सर्वजण अरुंद कठड्यावर उभे राहून बघत असतात. त्यामुळे एखादे वेळेस या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच हे मासे पकडण्यासाठी थांबलेल्या लोकांच्या दुचाकी ही या कठड्याच्या कडेला अस्ताव्यस्तपणे लावलेल्या असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या पुलावरून सध्या उसाच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर सह लहान-मोठी अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. यावेळी नेहमीच पुलावर गर्दी आढळून येते. अशावेळी वाहनांना क्रॉस करताना किंवा ओव्हरटेक करताना एखादी दुर्घटना किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलावरील धोकादायक पद्धतीने सुरू असलेली मासेमारी प्रशासनाने थांबवावी अशी मागणी या परिसरातील वाहनधारक व प्रवाशी वर्गातून होत आहे.
पुलावरून गळ टाकून पकडलेले मासे विकले तर दिवसाकाठी किरकोळ शंभर किंवा दोनशे रुपये मिळतात. मात्र कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने दिवस दिवसभर पुलावर थांबून मासे पकडतो व विकून मिळालेल्या पैशातून आम्हाला रोजी रोटी मिळते. - एक मासेमारी करणारा युवक