सातारा : माेबाईल हॅक करून सातारा शहरातील एका महिलेच्या बँक खात्यातून पाच व्यवहार करून सुमारे साडेपाच लाख रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखीवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी कल्याणी वसंत माने (सध्या रा. गोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दि. १४ मार्च रोजी सकाळी सवा आकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. तक्रारदार महिलेने मोबाईलवरून ऑनलाईन ट्रांझेक्शन केले होते. हे ट्रांझेक्शन चुकीचे झाल्याने संबंधित बँकेच्या ऑनलाईन तक्रारीबाबत माहिती घेतली. त्यावेळी तक्रारदारला एक मेाबईल क्रमांक मिळाला. त्यावर काॅल केला असता अज्ञाताने चुकीच्या ट्रांझेक्शनचे पैसे परत मिळविण्यासाठी प्रोसेस करण्यास सांगितले. त्यासाठी व्हाॅटसअॅपवर तक्रारदार महिलेला डेबीट कार्डचा फोटो आहे का? हे पाहण्यास सांगितले. त्यामुळे तक्रादारने डेबीट कार्डचा फोटो पाहिला. त्यानंतर अनोळखीने तक्रारदाराचा मोबाईल हॅक केला. तसेच तक्रारदाराच्या मोबाइलला येणाऱ्या ओटीपीद्वारे सलग पाच व्यवहार केले. यामधून ५ लाख ४४ हजार ४२९ रुपये अज्ञाताने स्वत:च्या बँक खात्यावर वर्ग केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे माहिती घेत आहेत.
मोबाईल हॅक करून महिलेच्या बँक खात्यातून साडेपाच लाख रुपये केले लंपास, साताऱ्यातील घटना
By नितीन काळेल | Published: March 17, 2023 2:20 PM