लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : हिंगणे (ता. खटाव) येथील अजय चंद्रकांत यादव (वय ४२) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांपैकी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. संबंधित संशयितांना सोमवार (दि. ५)पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हिंगणे (ता. खटाव) येथील अजय यादव यांनी त्यांच्या ओळखीतील लोकांना विविध कारणांसाठी एकूण रक्कम १९ लाख ९५ हजार रुपये दिले होते. मात्र संबंधितांनी त्यांचे पैसे न देता उलट त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली; त्यामुळे अजय यादव यांनी बुधवारी (दि. ३१) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हिंगणेतील लिबांच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना अजय यादव यांच्या पँटच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यात त्याने लोकांना दिलेले पैसे व वाहने परत न दिल्याबाबत सांगितले आहे.
या प्रकरणी अजय यादव यांचे वडील चंद्रकांत दत्तू यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १३ जनावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान सिकंदर बागवान (रा. वडूज, ता. खटाव), विलास दादासो शिंगाडे (रा. कातरखटाव, ता. खटाव), सुनील रामचंद्र गायकवाड (रा. वडूज, ता. खटाव), धनाजी पाटोळे (रा. वडूज, ता खटाव), विश्वास बागल (रा. वडूज, ता. खटाव), बाळू मासाळ (रा. वडूज, ता. खटाव), रवींद्र आनंदराव राऊत (रा. गणेशवाडी, ता. खटाव), वैभव संभाजी पवार (रा. हिंगणे, ता. खटाव), जालिंदर चंद्रकांत खुडे (रा. वडूज, ता. खटाव), पिनू पवार (रा. उंबर्डे, ता. खटाव), चंद्रकांत जगदाळे (रा. पेडगाव), अमित पिसे (रा. म्हसवड), अमोल कलढोणे (रा. म्हसवड, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
यापैकी इम्रान सिकंदर बागवान (३८), विलास दादासो शिंगाडे (४३), सुनील रामचंद्र गायकवाड (५० ), जालिंदर चंद्रकांत खुडे (३७) व रवींद्र आनंदराव राऊत (५०) यांना वडूज पोलिसांनी अटक केली.