वाई : येथील ढगे आळी भागात एका मंगल कार्यालयाकडून मोटारीतून आलेल्यांनी युवकावर गोळीबार केला. यावेळी चार ते पाच राउंड फायर करण्यात आले. यामध्ये अभिजित मोरे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाचजणांना ताब्यात घेतले आहे.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पूर्व वैमनस्य व सोशल मीडियावरील ग्रुपमधील पोस्टवरून आठ दिवसांपासून दोन गटांत वादावादी सुरू होती.
बुधवार, दि. १३ रोजी दिवसभर बंटी जाधव, सोन्या शिंदे व जखमी अभिजित मोरे हे अभिजित लोखंडे याच्या मागावर होते. याची माहिती अभिजित लोखंडे याला समजल्यानंतर तो अर्जुन राणा ऊर्फ यादव यासह अन्य साथीदारांना घेऊन घरासमोर वाट पाहत बसले होते.
याची माहिती बंटी जाधव गँगला मिळाल्याने या गँगचा मोर्चा रात्री आठच्या सुमारास अभिजित लोखंडे यांच्या घरी पोहोचला. दोन गटांत वादावादी झाली. त्यातून एकमेकांवर बंदुका रोखल्या गेल्या. अर्जुन यादवने केलेल्या गोळीबारात अभिजित ऊर्फ भैय्या मोरे याच्या छातीत गोळी घुसली. अभिजित मोरे जखमी झाल्याने इतरांनी तेथून पलायन केले.घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत सर्वजण पळून गेले होते. अभिजित लोखंडे यांच्या गँगमधील पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अभिजित लोखंडे (रा. पेटकर कॉलनी वाई), अर्जुन यादव ऊर्फ राणा (रा. लाखानगर), विजय लक्ष्मन अंकुशे (रा. धोम कॉलनी), सुनील अनिल जाधव (रा. सोनजाईनगर), नितीन विजय भोसले (रा. सोनगीरवाडी वाई) अशी ताब्यात पोलिसांनी घेतलेल्यांची नावे आहेत.
बंटी जाधव (रा. भुर्इंज), सोन्या शिंदे, धीरज जाधव (दगडे), संकेत जाधव (दगडे), अक्षय निकम (रा. वाई), नारायण जाधव (रा.भुर्इंज), संकेत जाधव यांच्यासह दहा ते बाराजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगण्यात आले.आरोपींना शोधासाठी नाकाबंदीगोळीबारानंतर दोन्ही गटांतील युवक पळून गेले. गोळीबाराचा आवाज एकूण परिसरातील लोक घराबाहेर आले. यामुळे गोळीबार करणारे व ज्यांच्यावर गोळीबार झाला ते सर्वजण पळून गेले. दोन्ही गटातील युवकांची व मोटारीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांची दोन पथके, व एलसीबीचे एक पथक आरोपीच्या शोधात रवाना झाले. सर्व रस्त्यांची नाकाबंदी केली आहे.