कऱ्हाड : युवतीसोबत लग्न लावून देण्याचा बनाव करून वृद्धाची सुमारे चार लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कºहाड तालुका पोलिसांत वधू-वर सूचक मंडळाच्या पदाधिकारी महिलेसह पाचजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संपतराव गणपती मोहिते (वय ७०, रा. बेलवडे, ता. कऱ्हाड , सध्या रा. कासेगाव, ता. वाळवा) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. अलीकडेच गाजलेल्या ‘डॉली की डोली’ या हिंदी चित्रपटातील कथानकासारखी हुबेहूब घटना कºहाडात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलवडे येथील संपतराव मोहिते हे गेल्या वर्षापासून कासेगाव येथे भाडेतत्त्वावर खोली घेऊन वास्तव्यास असून, तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. दि. २१ जून २०१७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संपतराव मोहिते हे कासेगावला जाण्यासाठी मालखेड फाटा येथे थांबले असताना संभाजी पवार (रा. कासारशिरंबे) हा त्यांना भेटला. ‘तुमच्या पत्नीचे निधन झाले आहे. मग तुम्ही दुसरे लग्न करणार आहे का?,’ असे त्याने संपतराव यांना विचारले. त्यांनी होकार दिल्यानंतर संभाजी पवारने त्यासाठी दीड लाखाची मागणी केली. संपतराव यांनी पैसे देण्यास होकार दिल्यानंतर संभाजी पवार याने त्याचा साथीदार सदाभाऊ लोहार (रा. साळशिरंबे) याला दुचाकी घेऊन त्याठिकाणी बोलवले. त्यानंतर संपतराव यांना घेऊन ते इचलकरंजीला गेले.
त्यावेळी त्या दोघांनी संपतराव यांच्याकडून वीस हजार रुपये अॅडव्हान्स घेतले. इचलकरंजीत गेल्यानंतर सदाभाऊ लोहारचा जावई संभाजी पवार त्यांना भेटला. ते सर्वजण इचलकरंजी येथील वंदना बापू पाटील यांच्या घरी गेले. त्याठिकाणी वंदना हिला संपतराव यांना दाखविण्यात आले. संपतराव यांनी वंदना पसंत असल्याचे सांगितले. तसेच वंदना हिनेही संपतरावांना पसंत केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संपतराव व वंदना यांनी एकमेकांना हार घातले.
हा कार्यक्रम सुरू असताना संपतराव यांनी त्यांच्याकडील पावणे तीन लाख रुपये असलेली बॅग नजीकच ठेवली होती. ती बॅग सदाभाऊ, त्याचा जावई, संभाजी पवार, अशोक पवार यांच्यासह वैशाली यांनी चोरली. विवाह समारंभ उरकल्याचे सांगून सर्वांनी संपतराव यांच्याकडून पार्टी मागितली. सर्वजण एका हॉटेलमध्ये जेवले. तेथील बिलही संपतराव यांनीच दिले. त्यानंतर संपतराव व वंदना हे दोघेजण तेथीलच एका नातेवाइकांच्या घरी राहिले. दुसºया दिवशी संपतराव यांनी वंदनाला तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन दिला. त्यानंतर ते दोघेजण टोप येथे गेले. टोप येथे संपतराव यांना सोडून वंदना निघून गेली. पाच दिवसांनी पुन्हा ती कासेगाव येथे संपतराव यांच्या घरी आली. तिच्या अंगावर काहीच दागिने नसल्यामुळे संपतराव यांनी त्याबाबत तिच्याकडे विचारणा केली. मात्र, आई-वडिलांनी दागिने काढून घेतल्याने तिने त्यांना सांगितले. त्याचदिवशी पुन्हा ती तेथून निघून गेली. संपतराव यांनी सर्वांकडे वारंवार विचारणा करूनही वंदना परत घरी आली नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संपतराव मोहिते यांनी कºहाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार इचलकरंजी येथील वधू-वर सूचक मंडळातील वैशाली, संभाजी पवार, सदाभाऊ लोहार, त्याचा जावई तसेच वंदना यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मिलिंद साबळे तपास करीत आहेत.'नवरीसाठी दागिनेही घेतलेपसंता-पसंती झाल्यानंतर नवºया मुलीसाठी संपतराव यांना दागिने खरेदी करावयास सांगितले. त्यानुसार संपतराव यांनी मुलीसाठी दोन तोळ्यांची बोरमाळ, जोडवी, पैंजण, चमकी, रिंगा, मंगळसूत्र तसेच कपडे खरेदी केले. हे साहित्य त्यांनी वंदना हिच्या नातेवाइकांकडे दिले. काही वेळांनंतर वंदना सर्व दागिने व नवीन कपडे घालून घरातील बाहेरच्या खोलीत आली. तेथेच लग्नाचा बनाव करण्यात आला.