सातारा : येथील बसस्थानकामध्ये एका रांगेत उभ्या केलेल्या शिवशाहीच्या एका बसला अचानक आग लागल्यानंतर पाठोपाठ पाचही बसने पेट घेतल्याने या सर्व बस जळून खाक झाल्या. या आगीचे कारण अस्पष्ट असून, यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. दरम्यान, दोनजण बसमध्ये सिगारेट ओढत बसले होते. त्यांच्या हातात लायटर होता. या दोघांमुळे आग लागल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
सातारा बसस्थानकातील शहर बसस्थानक थांब्यासमोर लॉकडाऊनपासून आठ शिवशाही बस उभ्या होत्या. एका रांगेत या बस उभ्या करण्यात आल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून या बस रस्त्यावर धावल्या नाहीत. मात्र, बुधवारी सायंकाळी बसस्थानकात नेहमीप्रमाणे प्रवाशांची लगबग सुरू असतानाच यातील एका शिवशाही बसला अचानक आग लागली. बसस्थानकातील प्रवासी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ बसजवळ धाव घेतली. एका बसची पाठीमागील बाजू पेटत होती. याचवेळी काहींनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. आग नेमकी कशी विझवायची, असा प्रश्न नागरिकांसमोर होता. दुसऱ्या बसनेही अचानक पेट घेतला. त्यावेळी मात्र, बसस्थानकात एकच हल्लकल्लोळ माजला. परिस्थिती नेमकी कशी हाताळावी, हे कोणालाही समजत नव्हतं. मात्र, धाडस करून काही व्यावसायिकांनी पाण्याचे फवारे मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीच्या ज्वाळा मोठ्या असल्यामुळे त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. पाहता पाहता पाचही बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगडोंब भडकल्याने धुराचे लोट अख्ख्या साताऱ्यातून दिसू लागले. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या पंधरा मिनिटांनंतर घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. मात्र, सुमारे अर्धा तास पाचही बसमधील आग धुमसत होती. गाडीमधील सर्व सीट, पडदे, फायबर, स्टेरिंग जळून खाक झाले. पाचही बसचा आतून केवळ सांगडा उरला.
चौकट : सीसीटीव्ही उलगडणार आगीचं रहस्य!
बसस्थानकातील जळीतकांडाचा तपास शहर पोलिसांनी तत्काळ हाती घेतला. ही आग नेमकी कशी लागली, याची कोणाकडे माहिती नव्हती. मग, पोलिसांनी बसस्थानकात असलेल्या नऊ सीसीटीव्हींचा आधार घेतला. विशेषत: बसस्थानकापेक्षा शेजारी असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांसमोरील सीसीटीव्ही पोलिसांसाठी महत्त्वाचे दुवे आहेत. हेच सीसीटीव्ही फुटेज आगीचे रहस्य उलगडणार आहेत.
चौकट : म्हणे, बंद गाडीचे शॉर्ट सर्किट होत नाही
शिवशाहीच्या पाचही बस बंद होत्या. त्यामुळे बंद असलेल्या गाडीचे शॉर्ट सर्किट होऊच शकत नाही, असा दावा पोलिसांकडून केला जातोय. त्यामुळे नक्कीच ही आग लावली असावी, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. आता या जळीतकांडाचे गूढ वाढले आहे.
चौकट : तीन बस वाचल्या!
एका रांगेत शिवशाहीच्या आठ बस उभ्या होत्या. सलग पाच बसनी पेट घेतल्यानंतर काही एसटी चालक तत्काळ गाडीत गेले. प्रवाशांनी या तीन बंद बस ढकलून बाजूला केल्या. त्यामुळे या तीनही बस वाचल्या. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
कोट : सातारा बसस्थानकात लावलेल्या खासगी शिवशाही गाड्यांचे दरवाजे उघडे होते. आग लागल्यानंतर प्रवाशांनी तिकडे धाव घेतली. तेव्हा एक व्यक्ती आतून बाहेर आली. त्याला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत चौकशी झाल्यानंतर खरे कारण स्पष्ट होणार आहे.
रेश्मा गाडेकर, वाहतूक निरीक्षक, सातारा आगार
....
चौकट : अकरा महिन्यांपासून ३२ गाड्या उभ्या
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गेल्या वर्षी मार्चपासून सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. तेव्हापासून सुमारे ३२ खासगी शिवशाही गाड्या सातारा बसस्थानकात उभ्या होत्या. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची होती, अशी माहिती एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी दिली.