मसूर : येथील जेठाभाई उद्यानात क्रिकेट खेळत असलेल्या मुलांवर पिसाळलेल्या वानराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तीन मुले जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. २९) सकाळी अकरा वाजता घडली. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.रविवारी शाळेला सुटी असल्याने येथील जेठाभाई उद्यानात काही विद्यार्थी क्रिकेट खेळत होते. यावेळी अचानक एका वानराने मुलांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात हर्षल चेणगे (वय १२), संकेत (वय १२) व शाहिद मुजावर (वय ११) हे तिघे जखमी झाले. यावेळी मुलांनी आरडाओरड करताच ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुंडा जाधव यांनी समय सूचकता दाखवत वानराला हाकलून लावले व मुलांची सुटका केली. याच वानराने पुढे परीक्षेसाठी जात असलेल्या दोन शाळकरी मुलींवर हल्ला केला. मात्र, तेथे असणाऱ्या शिक्षकांनी त्या मुलींची सुटका केली. शिवाजी हायस्कूल परिसरात तसेच गावामध्ये या वानरांचा गेल्या अनेक दिवसांपासून उपद्रव वाढला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभागाने या वानरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. (वार्ताहर)
पिसाळलेल्या वानराच्या हल्ल्यात पाच मुले जखमी
By admin | Published: March 29, 2015 11:07 PM