पुसेगाव : खटाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी काम करतानाच इतरही मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार महेश शिंदे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून बुध-वेटणे-निढळ-पेडगाव-वडुज या ग्रामीण भागांतील रस्त्याच्या कामासाठी चार कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या या रस्त्यांमुळे तालुक्यातील अनेक दुर्गम गावे मुख्य रस्त्याला जोडण्यात येणार आहेत.
गतवर्षी महेश शिंदे यांनी निधीतून वाहतुकीसाठी वाडेफाटा ते वाठार हा रस्ता मंजूर करून त्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. त्याचबरोबर भाडळे खोऱ्यातील भाडळे-डिस्कळ रस्ता पूर्णत्वास नेला. मुख्यमंत्री सडक योजनेतून नेर फाटा ते ललगुण रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आहे. खटाव तालुक्यातील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत करण्यासाठी नितीन गडकरी यांनी आमदार महेश शिंदे यांच्या शब्दाला मान देऊन बुध-वेटणे-उंबरमळे-पेडगाव-वडुज या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी चार कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याचे काम बुधपासून सुरू होणार असल्याने वेटने गाव मुख्य रस्त्याला जोडले जाणार आहे.
या कामासाठी पंचायत समिती सदस्या नीलादेवी जाधव, बुधचे सरपंच अभयराजे घाडगे, रणधीर जाधव, भरत मुळे, अविनाश रणसिंग, संजय नलवडे, सूरज नलवडे, तानाजी वलेकर तसेच वेटणे, रणसिंगवाडी, धावडदरे परिसरातील नागरिकांनी आग्रह धरला होता. दरम्यान, मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या कामांनाही लवकरच निधी मंजूर होईल. तसेच खराब झालेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करणार असल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले.