चाफळ : चाफळ विभागात गतवर्षी मार्च-एप्रिलदरम्यान कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. याचीच पुनरावृत्ती विभागात दिसून येत आहे. सध्या परिसरात कोरोनाचा कहर वाढत असून, गुरुवारी आलेल्या अहवालात माजगाव येथे नव्याने चारजण बाधित आले. बाधितांचा आकडा दहावर गेला आहे. यामुळे ग्रामस्थांबरोबरच नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. यामुळे पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सरपंच प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना कमिटी, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चाफळ विभागात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्याने धास्ती वाढली आहे. सडावाघापूर येथील कोरोनाबाधित वृध्देच्या मृत्यूनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढतच गेली. विभागात गतवर्षी मार्च, एप्रिलदरम्यान कोरोनाबाधितांचा आकडा वाढला होता. यावर्षीही याचीच पुनरावृत्ती सध्या विभागात दिसून येऊ लागली आहे.
चार दिवसांपूर्वी माजगावात सहाजण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे माजगावकर भयभीत झाले होते. त्यांच्या संपर्कातील लोकांसह गावातील इतर लोकांची चाचणी चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली होती.
याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यात आणखी चार बाधितांची भर पडल्याने माजगावचा आकडा दहावर जाऊन पोहोचला आहे. वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार माजगावातील एका किराणा दुकानदाराचा समावेश आहे. या दुकानाचा गावातील ऐंशी टक्के लोकांशी रोजचा संपर्क असल्याने बाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गावातील बाधितांचा आकडा वाढू लागल्याने कोरोना कमिटीचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच प्रमोद पाटील, सदस्य चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत कोरोना कमिटी, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. दुसरीकडे चाफळला गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराला माजगावसह विभागातील नागरिक येत असतात. माजगावात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला, तरी येथील लोकांनी गुरुवारी चाफळच्या बाजारात गर्दी केल्याने चाफळकरांचीही धाकधूक वाढली आहे. एकंदरीतच विभागातील बाधितांचा आकडा वाढू लागल्याने कधी गळा घोटल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने सर्वजण भयभीत झाले आहेत.