रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप गावात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाच दिवस पूर्णत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा कोरोना ग्रामस्तरीय समितीने दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा साप गावाला बसला आहे. आजअखेर सात ग्रामस्थांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. या मृत्यू झालेल्यांमध्ये ३८ वर्षांपासून ९१ वर्षापर्यंतच्या ग्रामस्थांचा समावेश आहे. सध्या प्राथमिक शाळेमध्ये सुमारे दहा बाधितांवर उपचार सुरू आहेत तर सुमारे पंचेचाळीस बाधितांवर घरीच उपचार करण्यात आले आहेत. तसेच काही बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने दि. १० ते १५ जून असा पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत गावातील फक्त मेडिकल व दवाखाने पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. इतर सर्वप्रकारची दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामध्ये किराणा मालाची दुकाने, भाजीपाला विक्री, पिठाच्या गिरण्या, चटणीचा डंक, दूध डेअरी, हॉटेल आदी आस्थापनांचा समावेश आहे. जे नागरिक अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर फिरतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सरपंच सुरेंद्र कांबळे यांनी दिला आहे.