सातारा : जिल्ह्यात साडेचार हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याचा दर एकदमच गडगडला आहे. सातारा बाजार समितीत तर पाच दिवसांत क्विंटलमागे १४०० रुपये दर कमी झाला आहे. गुरुवारी ५०० पासून १६०० रुपयांपर्यंत भाव आला. तर कोबी, टमाट्यानंतर आता वांग्याचा दर एकदम खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसू लागलाय.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. यामध्ये कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची ३९२ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५००पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील आठ दिवसांपूर्वी बाजार समितीत कांद्याचा दर ३५०० रुपये क्विंटलपर्यंत होता. मात्र, त्यानंतर एकदमच दर गडगडला.
सातारा बाजार समितीत गुरुवारी ५१ वाहनांतून ३६० क्विंटल फळभाज्यांची, तर कांद्याची ३९२ क्विंटलची आवक झाली, तर बटाटा ७६, लसूण २० आणि आल्याची १३ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक झाली. सातारा बाजार समितीत गवारला दहा किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. रविवारच्या तुलनेत दरात सुधारणा झाली. तसेच शेवगा शेंगला २०० ते ३००पर्यंत दर आला. शेवगा शेंगच्या दरात उतार आला, तर वांग्याला १० किलोला ५० ते ८० रुपये दर मिळाला. टमाटा ४० ते ६०, कोबीला ४० ते ५० रुपये भाव आला. टमाटा व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. त्यातच वांग्याचाही दर एकदमच कमी झाला आहे, तर फ्लॉवरला दहा किलोला ५० ते १०० अन् दोडक्याला २५० ते ३०० रुपये भाव आला.
बटाट्याला क्विंटलला १२०० हजारांपासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला तीन हजारांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १५००पर्यंत दर मिळाला. आल्याचा दर आणखी कमी झाला आहे, तर लसणाला क्विंटलला २ ते ५ हजारांपर्यंत भाव आला. लसणाचा दरही कमी होऊ लागला आहे. वाटाण्याला ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.
चौकट :
कोथिंबीरच्या दहाला दोन पेंड्या...
सातारा बाजार समितीत गुरुवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दर स्थिर आहे. मेथीच्या १ हजार पेंडीची आवक झाली. याला शेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळाला, तर कोथिंबीरची १५०० हजार पेंडी आली. याला शेकडा दर २०० ते ३०० रुपयांदरम्यान मिळाला, तर पालकला शेकडा ३०० ते ४०० रुपये दर आला. साताऱ्यातील राजवाडा परिसरात तर किरकोळ विक्रेते दहा रुपयांना कोथिंबीरच्या दोन पेंड्या विकत होते.
......................................................