सातारा : तालुक्यातील सारखळ येथे पाच शेतकऱ्यांचा जवळपास चाळीस हजार रुपयांचा कडबा रानातच पेटवून दिल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी , मच्छिंद्र रामचंद्र जगताप (वय ४९, रा. ठोंबरेवाडी, पो. नुने, ता. सातारा) यांची सारखळ हद्दीत मचट शिवारात शेती आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी आणि इतर चौघांनी मचट नावाच्या शिवारात असणाऱ्या शेतामध्ये ज्वारी काढून त्याचा कडबा वेगवेगळे ढीग लावून रचून ठेवला होता. मात्र, रविवार, दि. १४ रोजी सायंकाळी सात ते आठ या वेळेत कोणीतरी अज्ञाताने तो पेटवून दिला. यात कडबा जळून खाक झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर मच्छिंद्र यांनी सोमवार, दि. १५ रोजी दुपारी एक वाजता याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे हे करत आहेत.