मायणी : खटाव तालुक्यातील मायणी जिल्हा परिषद गटातील १८ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, अन्य दोन गावांमध्ये एका जागेसाठी मतदान होणार आहे.
खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मायणी जिल्हा परिषद गटातील अठरा ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे या जिल्हा परिषद गटांमध्ये असणारे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या राजकीय गटातच दुरंगी लढती होणार असेच चित्र नेहमी असते.
यावेळी अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये गावपतळीवर स्थानिक विकास आघाड्या, परिवर्तन पॅनेल यासह महाआघाड्या स्थापन करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या कशा पद्धतीने होतील यावर भर दिला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक गावात गावभेटी, कोपरा सभा, प्रचार फेरी व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपण कशाप्रकारे या भागाचा विकास केला आहे व कोणती विकासकामे केली आहेत, याची माहिती देत आहेत. शिवाय कोणत्या विकासकामांवर भर दिला जाणार आहे, याची माहिती देत आहेत.
मायणी जिल्हा परिषद गटातील गुंडेवाडी (मराठानगर), हिवरवाडी, ढोकळवाडी, गारुडी व अनफळे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर मुळीकवाडी व तरसवाडी या दोन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तर उर्वरित चितळी, कलेढोण, पाचवड, कान्हरवाडी, कानकात्रे, गारळेवाडी, मोराळे व धोंडेवाडी गावांमध्ये दुरंगी लढत पहावयास मिळणार आहे.
(चौकट)
भावकीतच वाढली चुरस..!
मोठी भावकी व राजकीय वारसा असलेल्या कुटुंबांमध्येच उमेदवारी देण्यात आली आहे, तर बहुतांश ठिकाणी मोठ्या भावकीतच दोन्ही गटांकडून उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे ही ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची होत आहे.
(चौकट)
अनेक गावांमध्ये शांतता बैठक
मायणी जिल्हा परिषद गट राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने वडूज पोलीस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख व पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी अनेक गावांमध्ये शांतता बैठकांचे आयोजन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.