आदर्की : फलटण तालुक्यातील कापशी येथे रविवारी सायंकाळी चोरट्यांकडून पाच घरे फोडण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र ‘आधी चोेरीला काय गेले याची खातरजमा करा, मग फिर्याद दाखल करा’ असे सांगत पोलीस घटनास्थळी फिरकलेच नाहीत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लग्नकार्यानिमित्त ठिकठिकाणचे पाहुणे कापशी या गावी आले होते. रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने बौद्ध वस्तीतील सर्वजण घराला कुलूप लावून लग्नासाठी निघून गेले. याचाच फायदा घेत चोरट्यांनी रविवारी सायंकाळी मोठ्या शिताफीने राजेंद्र काकडे, संतोष काकडे, सागर काकडे, हरीदास काकडे व भाऊसो काकडे यांच्या घराचे कुलूप कटावणीच्या साहाय्याने तोडले. पाचपैकी केवळ एकाच घरातून सोन्याची अंगठी व पैंजण असा मुद्देमाल चोरट्यांच्या हाती लागला. ते घेऊन चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. जाताना सोबत आणलेली कटावणी एका घरातच टाकून चोरटे पसार झाले.
सायंकाळी सहाच्या सुमारास काही ग्रामस्थ घराकडे परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने आदर्की दूर क्षेत्रात संपर्क करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पाच ठिकाणी चोरी झाल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणे गरजेचे होते; परंतु ‘अगोदर किती व कोणते साहित्य चोरीला गेले आहे याची खातरजमा करून घ्या, पोलीस आऊट पोस्टात येऊन तक्रार दाखल करा, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल’ असे पोलिसांकडून सांगण्यात आले. चोरट्यांच्या हाती जरी मोठी वस्तू लागली नसली तरी एकाच वेळी पाच घरे फोडल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
(चौकट)
.. म्हणे घटनास्थळी भेट दिली
पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता घटनास्थळी भेट देणे गरजेचे होते. मात्र, रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणीही कर्मचारी घटनास्थळी आले नाहीत. याबाबत आदर्की दूर क्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर चक्क पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असे सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.