आॅनलाईन लोकमतवाई : यशवंतनगर ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाली असून, तशा आशयाचा मोठा फ्लेक्सबोर्ड ग्रामपंचायतीच्या वतीने यशवंतनगर परिसरात लावण्यात आला आहे. यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या भीमनगरमधील पाचशे ग्रामस्थांकडे ना स्वत:चे शौचालय आहे, ना सार्वजनिक शौचालय आहे, ते आजही उघड्यावर शौचालयासाठी बसतात मग यशवंतनगर ग्रामपंचायत हागणदारीमुक्त कशी, असा प्रश्न उपस्थित करीत यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या भीमनगर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हागणदारीमुक्त घोषित करण्याला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, हागणदारीमुक्तीचा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास भीमनगर ग्रामस्थ तीव्र आंदोलन करून ग्रामपंचायती समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.निवेदनात असेही म्हटले आहे की, यशवंतनगर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाल्याचे कारण पुढे करत, ग्रामस्थांवर अनेक निर्बंध लादून दंड आकारण्यासाठी ग्रामस्थांना नाहक त्रास देण्याचा कुटील डाव सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यांनी आखला आहे. हागणदारीमुक्त ग्रामपंचायत आहे याचा खोटा दाखला देऊन पुरस्कार मिळवून शासनाकडून सन्मान व बक्षीस लाटण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. भीमनगर ग्रामस्थ हे कदापिही होऊ देणार नाहीत. उघड्यावर शौचास बसल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र येथील चारशे-पाचशे लोकांनी शौचालयास जावे कोठे? हाच मोठा प्रश्न आहे. याची स्वत: ग्रामपंचायतीने पाहणी करावी. उघड्यावर शौच करणाऱ्यांचे रेशनिंगकार्ड व मतदार ओळखपत्र रद्द करण्यात यावे, असे निर्देश सरकारने ग्रामपंचायतीला दिले असताना, ग्रामपंचायतीने भीमनगर ग्रामस्थांसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. ग्रामपंचायातीने भीमनगरमधील रहिवाशांसाठी शौचालयाची स्वत: व्यवस्था करावी, खोटी माहिती पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन करून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर बापूसाहेब शिंदे, दादासाहेब काळे, भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, लक्ष्मण भोसले यांच्यासह पाचशे ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
पाचशे ग्रामस्थांकडे शौचालय नसूनही गाव हागणदारीमुक्त
By admin | Published: March 27, 2017 12:07 PM