फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने नवीन हॉस्पिटल बांधण्यासह महत्त्वाच्या पाच विषयांना फलटण नगर पालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.
फलटण नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने ‘वेबेक्स’ या ॲपद्वारे आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नीताताई नेवसे होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शिंगणापूर रस्त्यावर लेडिज होस्टेलच्या मागे असलेल्या फलटण नगरपरिषदेच्या मालकीच्या १२ गुंठे जागेवर नवीन हॉस्पिटल उभे करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात येऊन हॉस्पिटलच्या खर्चास आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यामुळे शहरातील गरजूंना वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
फलटण नगरपरिषदेने १४ व्या वित्त आयोगातून नवीन रुग्णवाहिका घेतली आहे. गंभीर रुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिकेमध्ये व्हेंटिलेटर बसविणे गरजेचे होते. या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. कोरोनाने निधन झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना विशेष अनुदान भत्ता देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कोरोनाने निधन झालेल्या सूरज संजय चव्हाण या सफाई कामगाराची पत्नी सारिका सूरज चव्हाण यांना वारसा हक्काने नोकरीमध्ये सामावून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी ५० लाखांची मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांंनी दिली. सभेस मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, अशोकराव जाधव, अजय माळवे, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, सनी अहिवळे, असिफ मेटकरी, नगरसेविका वैशाली चोरमले, सुवर्णाताई खानविलकर, दीपाली निंबाळकर, मंगलादेवी नाईक-निंबाळकर, रंजना कुंभार, मदलसा कुंभार उपस्थित होते.