सातारा : शेअरबाजारात पैसे गुंतविण्याच्या आमिषाने एका विमा एजंटाची पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात व्यंकटेश विश्राम तानावडे (रा. राजापूर भटाळी, ता. ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यामध्ये अनेकजणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गौरांग मोहन शिंदे (वय ४६, रा. यशवंतनगर, शाहूपुरी सातारा) हे विमा एजंट आहेत. त्यांची व्यंकटेश तानावडे याच्याशी २०१७ साली एका मध्यस्तीकरवी ओळख झाली. त्यावेळी त्याने मी रिलायन्स सिक्युरीटीचे काम करत आहे. माझ्याकडे शेअरबाजारमध्ये गुंतवणुकीसाठी रिलायन्सची फ्रान्चाईसी शाखा राजापूर, ता. रत्नागिरी येथे असल्याचे सांगितले.
एवढेच नव्हे तर गेली दहा वर्षे मी हे काम करत असून माझ्याकडे सहाशे कस्टमर आहेत. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर नियमित परतावा दिलेला आहे. आपणही माझ्याकडे पाच लाच रुपये गुंतवणूक करा. तुम्हालाही मी वेळच्यावेळी परतावा देत जाईन, तसेच एक वर्षानंतर आपली रक्कम आपल्याला परत दिली जाईल, असे सांगितले.
मध्यस्थी असलेल्या जुबेर शेख यांनीही तीन लाख रुपये गुंतवले होते. त्यांना नियमित परतावा मिळत होता. तसेच जुबरे शेख हे व्यंकटेश तानावडे याला सुमारे सहा वर्षांपासून ओळखत होते. त्यामुळे गौरांग शिंदे यांनीही व्यंकटेश तानावडे याच्याकडे पाच लाख रुपये वडिलांच्या नावाचा धनादेश देऊन गुंतवले. त्यानंतर सुमारे दोन महिने ८५०० रुपये परतावा मिळाला. परंतु नंतर परतावा मिळाला नाही.
त्यामुळे व्यंकटेशला त्यांनी फोन केला. मात्र, त्याचा फोन लागला नाही. शिंदे यांच्यासह अन्य गुंतवणूकदार व्यंकटेश राहात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे गेले. परंतु या ठिकाणी व्यंकटेश सापडला नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.शेअर बाजारात पैसे गुंतविण्याच्या आमिषाने आणखी बऱ्याचजणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, तक्रारदारांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.