सातारा : येथील जरंडेश्वर नाक्यावर बुधवारी दुपारी तपासणी पथकाला तब्बल पाच लाखांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. रक्कमसह एका युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबात अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या निवडणुकीत गैरमार्गाने पैसा येऊ नये म्हणून पोलिसांनी शहरात येणारे आणि शहरातून बाहेर जाणाºया रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहेत. दरम्यान, येथील जरंडेश्वर नाक्यावर स्थिर सर्व्हेक्षण पथक वाहनांची तपासणी करत असताना एका जीपमध्ये पाच लाखांची रोकड असल्याचे निदर्शनास आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तेही निवडणुकीच्या धामधुमीत रोकड सापडल्याने साताºयात प्रचंड खळबळ उडाली.
या पथकाने संबंधित जीपसह अक्षय भोसले (रा. कुशी, ता. सातारा) या युवकाला चौकशीसाठी रात्री आठ वाजता शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांनी अक्षयकडे चौकशी केल्यानंतर ही पाच लाखांची रक्कम सेकंट हण्ड जेसीबी घेण्यासाठी बँकेतून काढली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे संबंधित बँकेमध्येही पोलीस चौकशी करणार आहेत. नेमकी रक्कम कशासाठी आणि कधी काढली, याची पोलीस चौकशी करत होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.