दहिवडी : दहिवडीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असून, मंगळवारी त्यात आणखी पाच रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ५९८ झाली असून, फेब्रवारी महिन्यात २६० बाधित निघाले आहेत. गेल्या पाच दिवसांत शंभरहून अधिक बाधित निघाले आहेत.
कोरोनामुळे दहिवडी २० फेब्रुवारीपासून लॉकडाऊन आहे. फेब्रवारी महिन्यात आरोग्य विभागाने जिवाचे रान करून थंडी, ताप, खोकला असणाऱ्या लोकांचा सर्व्हे करून बाराशेहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत. दहिवडीत तीन हजारांच्या घरात कुटुंबे असून, तीस टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबांच्या प्रत्यक्ष टेस्ट केल्या आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांची तब्बेत ठीक नसतानाही ते चोवीस तास कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या पथकातील काहीजण बाधित आल्यानंतर त्यांना विश्रांती दिली; मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी स्वतः दहिवडी शहराची परिस्थिती हाताळत आहेत.
दरम्यान, दहिवडी शहराच्या लाॅकडाऊनला अकरा दिवस झाले असून, आणखी लाॅकडाऊन वाढणार की उठणार याबद्दल दहिवडीकर चिंतेत आहेत. आणखी लाॅकडाऊन नकोरे बाबा अशीच मन:स्थिती झाली आहे.
चौकट
दहिवडी शहराच्या परिस्थितीचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा येथे मंगळवारी आढावा घेतला असून, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख, वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी या बैठकीला उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी सर्वतोपरी निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्याचे ठरले असल्याचे समजते.