औंध : चौकीचा आंबा ते रहिमतपूर रस्त्यावर शनिवारी रात्री उशिरा कासव व मांडुळाची तस्करी करणाºया पाचजणांच्या टोळीला औंध पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सुनील शिवाजी लोखंडे (वय ३४ रा. संगमनगर, सातारा), रोहन अंगद राऊत (२१, रा. बिदाल, ता. माण) शिवलिंग विश्वनाथ दुबळे (२६ , रा. दहिवडी, ता. माण), सागर विष्णू मदने (२३, रा. कोकराळे, ता. खटाव) प्रसाद जयवंत जाधव (२२, रा. खोकडवाडी, ता. खटाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.औंध पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे व सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या पथकाने अंभेरीनजीक सापळा रचला. यावेळी शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सूरज अशोक जाधव (रा. खालची अंभेरी ता. कोरेगाव) हा साथीदारांसह कासव व मांडुळाची विक्री करण्यासाठी आला. यावेळी पथकाने शिताफीने टोळीला अटक केली. त्यांच्याकडून एक कार, प्लास्टिक बॅलर जप्त केले. त्यामध्ये एक कासव आढळून आले. पोलिसांनी एकूण ६ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित सूरज जाधव मांडुळासह पळून गेला. याप्रकरणी औंध पोलिसांनी पाचजणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी रविवारी सर्व संशयित आरोपींना वडूज वन विभागाचे वनक्षेत्रपाल जे. आर. चव्हाण, वनरक्षक आर. एस. काशीद, बी. एस. जावीर यांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस हवालदार सुभाष काळेल, प्रशांत पाटील, नितीन सजगणे, कुंडलिक कटरे, सागर पोळ यांनी सहभाग घेतला.
कासवाची तस्करी करणाऱ्या टोळीतील पाचजण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 11:16 PM