फलटण : फलटण शहरात विनाकारण फिरणाऱ्या पन्नास लोकांची रविवारी अचानक प्रशासनातर्फे धरपकड करून रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये पाच जण पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात फलटण नगर परिषद फलटण व फलटण शहर पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या नावीन्यपूर्ण उपक्रम राबविताना शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली. मोकाट फिरणाऱ्यांना थांबवून यावेळी एकूण ५० लोकांची रॅपिड टेस्ट तातडीने करण्यात आली. त्यामध्ये एकूण पाच जण पॉझिटिव्ह मिळून आले. त्यानंतर त्यांना क्वारंटाइन केंद्रात भरती करण्यात आले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. कोणीही विनाकारण अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर फिरण्याचे बंद करावे, अन्यथा कारवाई करू, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाणे व फलटण नगर परिषद फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
(चौकट)
नागरिकांकडून कारवाईचे स्वागत..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दोन मोठ्या रुग्णवाहिका उभ्या करण्यात आल्या असून, पीपीई किटमध्ये दोन डॉक्टर तैनात करण्यात आले होते. त्यांच्या बाजूला मोठा पोलीस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचा फौजफाटा उभा करून मोकाट फिणाऱ्यांना अडवून त्यांची रुग्णवाहिकांमध्ये नेऊन कोविड टेस्ट करण्यात येत होती. या कारवाईने मोकाट फिरणाऱ्यांनी धास्ती घेतली होती, तर दुसरीकडे नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले.