सातारा : चलनातून कोणतेही पैसे बंद करण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून तसा अध्यादेश जारी केला जातो. असे असतानाही साताऱ्यातील बाजारपेठेत चक्क पाच रुपयांची नोट चलनातून बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आली असून, छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची भलतीच पंचाईत झाली आहे.
दैनंदिन व्यवहारासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एक, दोन, पाच या नाण्यांची तर पाच, दहा व वीस रुपयांच्या नोटांची निर्मिती केली. ही सर्व नाणी व नोटा सध्या चलनात आहेत. असे असताना साताऱ्यातील बाजारपेठेत पाच रुपयांची नोट चलनातून बंद झाल्याच्या अफवेचे भलतेच पेव फुटले आहे. छोटे-मोठे दुकानदार, रिक्षाचालक, मंडईतील विक्रेते पाच रुपयांची नोट स्वीकारण्यास नकार देत आहेत. अनेक विक्रेते ही नोट चलनातून बंद झाल्याचे ग्राहकांना सांगत आहेत. त्यामुळे पाच रुपयांच्या नोटांचे नक्की करायचे तरी काय, असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकला आहे.
गुरुवारी महात्मा फुले भाजी मंडईचा आठवडा बाजार भरला होता. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी या बाजाराला आले होते. या वेळी कांद्याची रोपे घेतल्यानंतर एका ग्राहकाने शेतकऱ्यांच्या हाती पाच रुपयांची नोट सोपवली. ही नोट पाहताच शेतकऱ्यांने ‘पाच रुपये चालतच नाहीत, मी घेऊन काय करू’ असे उत्तर दिले. ग्राहकाने त्याला ‘नोट अजूनही चलनात आहे, बंद झालेली नाही’ असे सांगितले. मात्र विक्रेता आपल्या मतावर ठाम होता. अखेर दुसरी नोट घेतल्यानंतरच त्याने संबंधित ग्राहकाला कांद्याची रोपे देऊ केली. असाच अनुभव किराणा दुकानातही आला. आरबीआयकडून पाच रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा कोणताही अध्यादेश काढण्यात आला नाही. असे असताना बाजारपेठेत चुकीची माहिती पसरविली जात आहे. नागरिकांची अशी दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हादेखील दाखल होऊ शकतो.
(कोट)
पाच रुपयांची नोट अजूनही चलनात आहे. चलनातून ती बंद झालेली नाही. मात्र बाजारपेठेत कुणी तरी अफवा पसरवल्याने अनेक जण ही नोट देण्यास व घेण्यास नकार दर्शवितात. त्यामुळे विक्रेते, दुकानदार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- नीलेश पवार, व्यावसायिक सातारा
फोटो : २१ जावेद ११