सातारा : राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्रमी दरवाढ झाल्याने सर्वत्र महागाईची चर्चा होत आहे. दोन महिन्यांतील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना त्यातून उभारी घेताच मागील काही दिवसांमध्ये बाजारात टोमॅटोची आवक वाढली. सोमवारी सातारा बाजार समितीमध्ये ७० क्विंटल आवक झाल्याने टोमॅटोची तीन ते पाच रुपये किलोने विक्री झाली. बाजारात टोमॅटो आणण्याचा खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून दिला.
सातारा जिल्'ामध्ये आॅगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कºहाड आदी तालुक्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कृष्णा, कोयना नद्यांना पूर आल्याने नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे भाजीपाल्याची पिके कुजल्याने बागायतदार शेतक-यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याचवेळी खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण, खटावमध्ये एक चांगली संधी म्हणून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. मात्र, निसर्गाने पुन्हा घात केला अन् नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यात सलग पंधरा दिवस पडत असलेल्या पावसाने भाजीपाला आणि फळबागांचे अतोनात नुकसान केले. काढणीस आलेला कांदा शेतातच सडला.
या संकटात खचतील ते शेतकरी कसले. त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली. हजारो रुपयांची रासायनिक खते आणि औषधांचा वापर करून भाजीपाल्याच्या बागा जगविल्या. टोमॅटो उत्पादकांना तर अच्छे दिनची स्वप्ने पडू लागली. त्यासाठी त्यांनी जीवतोड मेहनत घेतली. बाजारात कांदा आणि इतर भाजीपाल्यास विक्रमी दर मिळू लागले. सुरुवातीला काही दिवस टोमॅटोला १५ ते २० रुपये दर मिळत होता; पण ही परिस्थिती जास्त दिवस टिकली नाही. आवक वाढल्याने बाजार गडगडू लागे अन् दर २ ते ५ रुपयांवर येऊन ठेपले. त्यामुळे उत्पादन खर्च सोडा, साधा वाहतूक आणि हमालीचा खर्चही निघेनासा झाला आहे. अच्छे दिनच्या अपेक्षेने लाखो रुपये खर्च करून फुलवलेली टोमॅटोची बाग आज अशीच सोडावी लागत आहे. अनेकांनी टोमॅटोला दर न मिळाल्याने ते रस्त्यावर टाकले आहेत.
- कर्जबाजारी शेतक-यांच्या पाठी वसुलीचा तगादा
टोमॅटो आणि भाजीपाल्याच्या बागा पावसात भिजल्याने फळावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करून त्या जगविल्या; पण आज बाजारात शेतमाल मातीमोल ठरत आहे. पावसाने शेतक-याचे जे अतोनात नुकसान झाले असून, त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबेना. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांच्या पाठीमागे बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे.
बाजार समित्यांमध्ये जो काही उच्चांकी भाव मिळतो, तो मोजक्या व चांगल्या प्रतिच्या टोमॅटोला; पण चर्चा होते ती सरसकटच्या उच्चांकी दराची. टोमॅटो घसरला असून, दोन ते सहा रुपये किलोला दर दिला जात आहे. शेतातून बाजार समितीमध्ये टोमॅटो वाहून आणण्याचा खर्चही निघत नाही, अशी ही स्थिती आहे. लागवड खर्च व वाहतूक खर्च लाखोत आहे.-रामचंद्र यादव, उत्पादक शेतकरी