सातारा : नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार, दि. १ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर, पाचगणी व फलटण या पालिका बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलनात सहभागी होऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. या आंदोलनामुळे शासकीय कामकाजासाठी आलेल्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. अत्यावश्यक सेवा या संपातून वगळण्यात आल्या आहेत.
कऱ्हाड पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. या आंदोलनात महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. मागण्या मान्य करीत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी कर्मचाऱ्यांनी केला.फलटण पालिकेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शविला. पाचगणी पालिकेचे कामकाज मंगळवारी सकाळपासूनच बंद होते. नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी पालिका प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली.
बंदमुळे सर्वच पालिकांमध्ये शुकशुकाट पसरला होता. वाई, म्हसवड व रहिमतूपर पालिका संपात सहभागी न झाल्याने येथील कामकाज मात्र नेहमीप्रमाणे सुरू होते.