- प्रगती जाधव-पाटीलसातारा : सभेला जमलेल्या गर्दीवरून उमेदवाराच्या विजयाचा अंदाज भलेही लावत येणार नाही, पण या गर्दीमुळे पाकिटमारांची चांगलीच दिवाळी होते. हल्ली स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्यांना पक्षाच्या मंडळींनाही स्वत:चा खिसा सांभाळता येत नाही.देशात सर्वत्रच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या सभांचे फड रंगू लागले आहे. नेत्यांच्या, उमेदवारांच्या सभांना गर्दी जमविण्यासाठी काही ठेकेदारही पुढे सरसावले आहेत. प्रति मानसी मजुरी आणि खानपानाची सोय करून गर्दी जमविण्याचे कंत्राट दिले जात आहे. मात्र, या गर्दीत दर्दीपेक्षा चोरट्यांची संख्या जास्त आढळून येत आहे. नेत्याच्या भाषणापेक्षाही तुमचे दागिने, पाकीट आणि मोबाईलकडे या पाकिटमारांचे लक्ष अधिक असते. या गर्दीत पाकिटमार चोरटे चांगलेच हात धुवून घेत आहेत. चोरीला गेलेली रक्कम कमी असल्यामुळे याविषयी पोलिसांत तक्रार केली जात नाही. तरीही पाच हजाराची गर्दी असणाºया एका सभेत साधारण पन्नास हजार रुपयांची चोरट्यांची कमाई होते. ही कमाई करण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातून आलेल्या महिला त्यांचे सावज असतात.चुकीच्या संगतीमुळे वाम मार्गाला लागलेला आणि आता स्वत: कष्टाने जगणाºया पूर्वाश्रमीच्या चोराने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला याविषयी फारच रोचक माहिती दिली. त्याच्या माहितीनुसार ‘सभेच्या ठिकाणी जाताना त्यांची टोळी स्वतंत्र गाडी करून कार्यकर्ते म्हणूनच पोहोचते. अनुभवाच्या जोरावर गर्दी कुठं असणार, हे हेरून तिथं उभं राहिलं की, सावज अवतीभवती असतं. संधी मिळाली की बोटांमध्ये असलेलं छोटं ब्लेडचं पान काम फत्ते करतं. अलीकडे या पाकिटमारांमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय वाढत आहे.’महायुतीच्या सभेतही पाकिटमारी!रविवारी कोल्हापुरात भाजपा-शिवसेना युतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. सभेला प्रचंड गर्दी जमली होती. शिवाय, सभा संध्याकाळी असल्याने पाकिटमारांचे चांगलेच फावले. या सभेत किमान दोन-तिनशे लोकांचे पाकीट मारले गेल्याचा संशय आहे. काही जणांनी पोलिसांकडे तक्रार केली, पण इतरांनी रिकाम्या पाकिटानेच घर गाठले!
पाच हजारांची गर्दी त्यांना मिळवून देते ५० हजार!, पाकिटमारांची चांदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 2:24 AM