सातारा : अवकाळी पावासाने शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी पुरते हवालदिल झाले असताना सरकारकडून काही मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण अद्याप शासनाने एक छदामही न दिल्याने शेतकऱ्यांची पुरती कोंडी होऊन बसली आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यांप्रमाणेच सातारा जिल्हयातही अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. गतवर्षी मे महिन्यापासून शेतकरी उभ्या पिकाचे नुकसान होताना पाहतो आहे. जिल्ह्यातील अनेक भागात फळबागा केल्या जातात. पाण्याची कमतरता असतानाही शेतकरीवर्ग कमी पाण्यावर पिके आणतात. पण ऐन उत्पन्न मिळण्याच्या वेळेत अवकाळी पाऊस घात करत आहे. गतवर्षी मे, नोव्हेंबर व डिसेंबर तर यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पावसाने धुडगूस घातला. काही ठिकाणी गारांचा गच पडल्याने पिकांचे नुकसान झाले. द्राक्षबागा तर उन्मळून पडल्या. डाळिंब, आंब्यांचेही मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांनाही या पावसाचा तडाखा बसला. शेतकऱ्यांनी शेतात कापून टाकलेली पिकेही वाया गेली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा पाच हजारांच्यावर गेला आहे. तर हजारो हेक्टर जमीनीवरील पिकांचे झालेले नुकसान भविष्यात अन्न टंचाईचे कारण ठरणार आहे. जिल्हा प्रशासन पंचनाम्यांचे कागद तयार करुन शासन दरबारी पाठवित असले तरी शासन दया दाखवायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यातच ५0 टक्क्यांच्यावर नुकसान झाले तरच नुकसान भरपाई देण्याचा नियम असल्याने अनेक शेतकरी भरपाईचा दावाही करु शकले नाहीत. भांडवल गुंतवून पिके काढायची मात्र त्याला संरक्षणच मिळत नसेल तर काय गरज आहे प्रयोग करायची?, अशी प्रतिक्रिया आता शेतकरी व्यक्त करु लागले आहेत. उद्योगांच्या भरभराटीसाठी सरकार पॅकेज जाहीर करते, मग शेतीत नुकसान झाले तर शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही काय? असा सवालही विचारला जात आहे. (प्रतिनिधी)मदतीचे मिळतायत संकेतअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई देण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. मे २0१४ पासून शेतकरी गारपिटीतील नुकसानीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्राच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी विदर्भ मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. अवकाळी पाऊस वारंवार शेतातल्या पिकांचे नुकसान करतो. उभ्या पिकांसोबतच काढून ठेवलेल्या पिकांचेही मोठे नुकसान होते. मागील महिन्यात झालेल्या पावसामध्ये कापणी करुन ठेवलेल्या ज्वारी, गहू या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पीक उचलण्याआधीच तो कोसळत असतो. मात्र शासन त्याची नुकसान भरपाई देत नाही, हा नियम बदलावा. - विश्वास बाबर, शेतकरी
मदतीच्या प्रतीक्षेत पाच हजार शेतकरी
By admin | Published: March 23, 2015 9:12 PM