पाचगणी : लॉकडाऊनचे निर्बंध झुगारून अर्धे शटर उघडून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी स्वतः नगर परिषदेच्या भरारी पथकासोबत राहून पोलिसांच्या उपस्थितीत दहा व्यावसायिकांवर धडक कारवाई करीत पाच हजारांची दंडात्मक वसुली केल्याने अनेक व्यावसायिकांची धावपळ झाली.
पाचगणी शहरात काही व्यावसायिक निर्बंध झुगारून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्याने शनिवारी सकाळी स्वतः मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी भरारी पथकासोबत बाजारपेठेतून फेरफटका मारून लॉकडाऊन झुगारून अर्धे शटर उघडून व्यवसाय करणाऱ्या दहा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करीत प्रत्येकी ५००० रुपयांचा दंड वसूल केल्याने अनेक व्यावसायिकांनी नगर परिषदेच्या या धडक मोहिमेचा धसका घेत भीतीपोटी दुकाने बंद केली, तर काही ठिकाणी भरारी पथक पुढे जाताच व्यवसाय सुरू, असेही चित्र पाहावयास मिळाले.घरपोच सेवा देण्याचे आवाहन...मुख्याधिकाऱ्यांनी शनिवारी स्वतः धडक मोहिमेत सहभागी होत कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईच्या माध्यमातून इतर व्यावसायिकांना सूचक इशाराच दिला असून, यापुढे कारवाई अधिकच कडक करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले, तर अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना नागरिकांना दुकानात न घेता घरपोच सेवा देण्याचे आवाहन केले आहे.