पाचगणी : पशुसंवर्धन विभाग सातारा अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना पाचगणी व नगरपरिषद पाचगणी आणि पोलीस स्टेशन पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने अश्व तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये १६२ अश्वांची तपासणी नुकतीच करण्यात आली आहे.आशिया खंडामधील द्वितीय क्रमांकाचे पठार म्हणून पाचगणी शहराची नावलौकिक आहे. तसेच आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील टेबल लँडवर चालणारी घोडेसवारी आणि टांगा सवारी. पर्यटकांच्या दृष्टीने हा नक्कीच गमतीचा भाग असला तरी कधीकधी चुकून होणारे अपघात या व्यवसायाला गंभीरपणे बघायला भाग पाडतात.
अशा काही घटना घडल्याने पाचगणी येथे सर्व घोड्यांचे नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी पशुसंवर्धन विभाग सातारा अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना पाचगणी यांनी पुढाकार घेतला. तसेच नगरपरिषद पाचगणी आणि पोलीस स्टेशन पाचगणी यांनी उत्तम सहकार्य केले.घोडे मालकांसाठी एक आदर्श आचारसंहिता आणि नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना गणवेश आणि आदी नियम सुचवण्यात आले. मागील वर्षी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर्व अश्व मालकांना ही नियमावली अंगवळणी पडली. याचाच एक भाग म्हणून नुकताच पाचगणी पशुवैद्यकीय दवाखानातर्फे अश्व नोंदणीकरण नूतनीकरणाचे एक शिबिर घेण्यात आले.यामध्ये सर्व अश्वांची वैद्यकीय तपासणी करून ते योग्य असतील तरच त्यांना आरोग्य सुदृढता दाखला देण्यात आला. १६५ अश्वांना अशाप्रकारे दाखले देण्यात आले आहेत. याच धर्तीवर भारतामधील अनेक थंड हवेच्या ठिकाणी घोडा सवारी चालते तेथे अशी नोंदणी करणे, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आणि गरजेचे आहे. यावेळी नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी व असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.
आपलं घर चालवणाऱ्या अश्वाची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्याला धनुर्वात आणि आदी लसी देऊन, उत्तम आहार आणि जंतनाशके देऊन, त्यांची काळजी अश्व मालकांनी घ्यायला हवी.- डॉ. सुनील देशपांडे, पशुधन विकास अधिकारी, पाचणगी