कऱ्हाड : कर्हाड तालुक्यातील येणके येथे ऊस तोड सुरू असताना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पाच वर्षीय मुलावर हल्ला केला. संबंधित मुलाला त्याने उसाच्या शिवारात सुमारे अर्धा किलोमीटर फरफटत नेले. मजुरांनी पाठलाग केल्यानंतर उसात मुलाला सोडून बिबट्याने धूम ठोकली. मात्र या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आकाश बिगाशा पावरा असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कर्हाड तालुक्यातील येणके किरपे परिसरात ऊस तोडी सुरू आहेत. त्यासाठी कारखान्यांच्या ऊस मजूर टोळ्या शिवारात राहण्यास आल्या आहेत. सोमवारी सकाळी येणकेतून किरपेकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शिवारात मजुरांची एक टोळी उसाची तोड करत होती. या टोळीतील एका कुटुंबातील पाच वर्षीय आकाश पावरा हा मुलगा मजुरांपासून काही अंतरावर शेतात खेळत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. मुलाला फरपटत बिबट्या घेऊन जात असताना हा प्रकार मजुरांचा निदर्शनास आला. त्यांनी पाठलाग सुरू केला. त्यावेळी अर्धा किलोमीटर उसाच्या फडात मुलाला सोडून बिबट्याने तेथून धूम ठोकली. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात संबंधित मुलगा ठार झाला.
तालुक्यात गत काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून पाळीव जनावरांसह त्याने ग्रामस्थांवर ही हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण आहे.