शेखर जाधववडूज : खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील तलावामधील पाण्याचा मृतसाठा दिसून येत असल्याने सुरक्षित पाणथळ आणि मुबलक अन्नसाठ्यामुळे रोहित पक्षी (प्लेमींगो) या परिसरात दाखल झाले आहेत. मनाला भूरळ घालणारे स्थलांतरित प्लेमिंगो पाहुणे पक्षी मुक्कामास आल्याने परिसरात किलबिलाट वाढला आहे. तलाव परिसरात पक्ष्यांचा वावर वाढल्याने निरीक्षणासाठी पक्षीप्रेमींची पावले येरळा तलावाकडे वळू लागली आहेत. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ गोठण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे परदेशी पाहुणे सैबेरिया, चीन, अफगाणीस्तान, रशिया आदी देशातून भ्रमंती करत राज्याच्या काही भागात येतात. सध्या तलावात चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल आदी पाहुण्यांनी बहरला आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमी तलाव परिसरात दाखल होत आहेत.
यापूर्वी मुंबई परिसरात सुमारे दीडलाख प्लेमिंगो पक्षांचे आगमन झाले होते. त्यातील ३० टक्के पक्षी स्थायिक झाले. या पाहुण्यांचे सातत्य टिकविण्यासाठी तलाव परिसरातील जैविक विविधता जोपासने गरजेची आहे. - डॉ. प्रविण चव्हाण, पक्षी अभ्यासक