कोळकी : थ्री फेज व सिंगल फेज विजेच्या लपंडावामुळे विडणीतील नागरिक, व्यावसायिकांसह शेतकरी वर्ग हैराण झाले असून, वीज बिल भरण्यासाठी तगादा लावणारे महावितरण विना खंडित वीजपुरवठा कधी करणार, असा सवाल नागरिकांमधून होत आहे.
लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक गणिते कोलमडून गेली असताना नुकतीच लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने लोकांनी समाधान व्यक्त करून आपली दुकाने, व्यवसाय सुरू केले. मात्र, वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने विजेवर अवलंबून असणारे, तसेच व्यावसायिकांना वेळेचे बंधन जिल्हाधिकाऱ्यांनी घातल्याने चांगलीच अडचण झाली आहे. दुकाने उघडूनही वीज नसल्याने काम करणे अवघड होऊन बसले आहे. यामुळे आर्थिक फटकादेखील बसत आहे.
सोमवार ते गुरुवारपर्यंत सकाळी आठ तास थ्री फेज वीज शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मिळत असते, थ्री फेज विजेचा; पण लपंडाव सुरू असल्याने वीज नसल्याने विहिरीत पाणी असूनही पिकाला पाणी मिळत नसल्याने उभी पिके जळू लागली आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे व्यावसायिक नागरिक शेतकरी वर्ग हैराण झाले आहेत. महावितरणने याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाचा उद्रेक झाल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील.
(चौकट)
महावितरणने उलटा कारभार
विडणी गाव फलटणला जवळ असल्याने फलटणवरून विडणी गाव सिंगल फेज वीज जोडणे सोयीस्कर झाले असते; परंतु सिंगल फेज वीज बरडवरून विडणीला जोडून महावितरणने उलटा कारभार करून वारंवार वीज जाण्यामुळे विडणीकरांची डोकेदुखी वाढविली आहे.