सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी देवी चौक, मोती चौक, राजवाडा व गोल बाग परिसरात फूटपाथ व रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड व लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. फूटपाथवरील भाजीविक्रेत्यांवरही यावेळी कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वादही झाले.रस्त्यावरील अतिक्रमणांबाबत ह्यलोकमतह्णमध्ये नुकतीच वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली. याची दखल घेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारपासून धडक मोहीम हाती घेतली. शहरातील देवी चौक परिसरातून कारवाईस सुरुवात झाली. अनेक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व कापड विक्रेत्यांनी फूटपाथ व रस्त्यावर ठेवलेले फ्लेक्स बोर्ड जप्त करण्यात आले.
मोती चौक ते गोल बाग परिसरातील भाजीविक्रेत्यांचे साहित्य जप्त करून फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्यात आला. सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्या हातगाडीधारकांना या मोहिमेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.दरम्यान, मंगळवारी सकाळी मोती ते पाचशेएक पाटी या मार्गावर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.