दहिवडी/फलटण : सातारा जिल्ह्याच्या पूर्व व दुष्काळी असणाऱ्या माण आणि फलटण तालुक्यांमध्ये रविवारी अनेक ठिकाणी जलधारा बरसल्या. मध्यम स्वरूपाच्या या पावसामुळे पाणी-पाणी झाले होते. खरीप हंगामातील बाजरीला या पावसाचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण हे दुष्काळी तालुके आहेत. वळवाचा पाऊस आणि परतीच्या मान्सूनवर येथील शेतीचा भरवसा आहे. यावर्षी वळवाचे पाऊस चांगले झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. माण तालुक्यात तर यंदा पहिल्यापासून पावसाचे प्रमाण चांगले राहिलेले आहे. असे असले तरी अनेक गावांमध्ये पाऊस पडला नसल्याचेही दिसते. फलटण तालुक्यात तर वळवाचा पाऊस सोडला तर मान्सूनचा चांगला पाऊस झाला नव्हता. मात्र, रविवारी तालुक्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. माण तालुक्यातील दहिवडी, कुकुडवाड, वरकुटे मलवडी परिसरात पाऊस होत आहे. रविवारी दहिवडी, गोंदवलेसह आजूबाजूच्या परिसरात रिमझिम पाऊस झाला. तर वरकुटे मलवडी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची व मजुरांची पळापळ झाली. भांगलणीसाठी गेलेल्या महिलांना काम सोडून घरी यावे लागले. पिकांच्या ओप्यात पाणी साचले होते. फलटण तालुक्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र, रविवारी फलटण शहर व तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. काहीनी मान्सून पूर्व पावसावर खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. गेले काही दिवस नुसते ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारनंतर पावसाने फलटण तालुक्यात चांगली हजेरी लावली. या पावसाने उकाडा कमी होण्याबरोबरच सखल भागात पाणी साचले होते. या पावसामुळे फलटण शहरातील आठवडा बाजाराला आलेले विक्रेते आणि ग्राहक यांची चांगली तारांबळ उडाली. फलटण पूर्व भागातील अनेक गावांत ही पाऊस सुरू होता. (प्रतिनिधी)
दुष्काळी भागात ‘जलधारा’!
By admin | Published: July 25, 2016 12:30 AM