लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : कोरोना महामारी संकटाचे थैमान सुरू असतानाच महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक गावे, शहरांना पुराचा फटका बसला आहे. कऱ्हाड तालुक्यातील नांदगावचाही त्यात समावेश आहे. येथील एकनाथ साळुंखे यांच्या घरात पाणी घुसल्याने घर जमीनदोस्त झाले आहे. आता यातून सावरायचे कसे, अशा विवंचनेत असतानाच कुटुंबातील या कर्त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दक्षिण मांड नदीच्या काठावर नांदगाव हे गाव वसले आहे. यंदा या नदीला प्रथमच मोठा पूर आला. गावातील ५३ कुटुंबे बाधित झाली, लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यात पाच घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली. यापैकी एक घर एकनाथ केशव साळुंखे यांचेही आहे.
एकनाथ साळुंखे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे. ते स्वतः पत्नी, मुलगा असे नांदगावमध्ये राहतात. त्यांना तीन मुली असून, त्यांचे विवाह झाले आहेत. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून साळुंखे दाम्पत्य आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे या परिवारावर आभाळच कोसळले आहे.
नांदगावमध्ये गुरुवार, दि. २२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण मांड नदीला पूर आला. प्रथमच आलेल्या या पुरामुळे नांदगावकर भांबावून गेले. घरातील साहित्य जागच्या जागेवर ठेवत जीव मुठीत घेऊन लोक घराबाहेर पडले. दोन दिवसानंतरच पूर ओसरला, तेव्हा घरातील धान्य, साहित्य खराब झालेले पाहायला मिळाले. एकनाथ साळुंखे यांचे राहते घर तर पडलेले होते. त्यामुळे आता खायचं काय? राहायचं कुठं? या विवंचनेत असतानाच साळुंखे यांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांच्यावर कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
चौकट
फक्त आठ गुंठे जमीन
साळुंखे यांची फक्त ८ गुंठे शेतजमीन आहे. तेही माळरान आहे. त्यामुळे इतरांकडे मोलमजुरी करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी संसार करून तीन मुलींचे विवाह केले आहेत तर मुलगा शिक्षण घेत आहे. त्यामुळे साळुंखे परिवाराला नेहमीच कसरत करावी लागली आहे. ती अजूनही संपलेली नाही.
कोट
पुराचे पाणी घुसल्याने आमच्या राहत्या घराचे नुकसान झाले आहे. त्यातच वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. आमच्या परिस्थितीचा विचार करून शासनाने योग्य ते सहकार्य करावे, ही विनंती.
- आशिष साळुंखे
मुलगा
फोटो ३१ नांदगाव
नांदगाव (ता. कऱ्हाड) येथील एकनाथ साळुंखे यांचे घर जमीनदोस्त झाले आहे.
फोटो
एकनाथ साळुंखे (आयकार्ड)