सातारा : गावकरी गाढ झोपेत असताना उशाला असलेला अख्खा डोंगर कोसळला अन् भूस्खलनाचा महापूर धडाडत खाली आला. पण गावावर न येता गावाला अगदी खेटून हा महापूर गावापासून दूरवर गेला. सकाळी झाेपेतून उठल्यानंतर हे विदारक दृश्य पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा अक्षरश: ठोका चुकला. हा भूस्खलनाचा महापूर गावावर आला असता तर काय झाले असते, या विचारानेच गावकरी अक्षरश: हादरून गेलेत.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये भूस्खलनाच्या घटना यंदा सर्वाधिक घडल्यात. आंबेघर, मीरगाव, ढोकावळे या गावांना भूस्खलनाचा जबर फटका बसलाय. आंबेघरमध्ये १५ जणांचा जीव गेलाय. या घटनांनी समाजमन पुरते हबकून गेले असतानाच पाटण तालुक्यातच आणखी एक मनाला हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या व सत्तर घरांचा उंबरठा असलेल्या जुगाईवाडीतील ही घटना आहे. गावकरी गाढ झोपेत असताना पहाटे चारच्या सुमारास
जुगाईवाडीच्या अख्खा डोंगराचे भूस्खलन झाले. दगड, झाडे उन्मळून पडून भूस्खलनाचा महापूर आला. गावाला खेटून हा महापूर गावकऱ्यांची भातशेती उद्ध्वस्त करून गावापासून दूरवर निघून गेला. काही गावकरी सकाळी झोपतून उठल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. हे भीषण वास्तव पाहून गावकरी हबकून गेले. आंबेघरची परिस्थिती क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर तरळली. हा भूस्खलनाचा महापूर गावावर कोसळला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं. असं गावकरीबोलू लागले. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. नोकरीनिमित्त मुंबई, पुण्याला असलेल्या आपल्या मुलांनाही या भीषण दुर्घटनेची कल्पना दिली. त्या काळरात्री गावावर ओढावलेलं संकट टळल्याने गावकरी आनंदित आहेत. पण काबाडकष्ट करून तयार केलेली भातशेती या भूस्खलनात गायब झाली. त्यामुळे गावकरी चिंताग्रस्तही आहेत.
चाैकट :
आता भविष्याची चिंता..
या दुर्दैवी घटनेने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. डोंगर पुन्हा कोसळणार तर नाही ना, या विचाराने अनेकजण भयभीत झाले आहेत. प्रशासनाने या गावाचा नुकसानीचा पंचनामा केला आहे. आता भातशेतीची भरपाईसुद्धा मिळेल. पण गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावू लागला आहे. सर्वांना मृत्यूने एखदा हुलकावणी दिली आहे; पण भविष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, या विचाराने गावकरी चिंताग्रस्त आहेत.
फोटो : ३१ पाटण फोटो