कऱ्हाड दक्षिणेतून वाहणाऱ्या दक्षिण मांड नदीने आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच रौद्ररूप धारण करीत नदीकाठची शेतीजमीन, उसासह इतर पिके, विहिरी, विजेचे खांब आदींचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. येवती येथून वाहत आलेल्या नदीचे उंडाळे हद्दीत तुळसण फाट्यानजीक पात्रच बदलले असून नदीतील पाणी शेतीतून मार्ग काढत वाहिले आहे. शेतीत असणारे उसाचे पीक, विहिरी, विद्युत पंप, पाईपलाईन, बोअरिंग, रस्तेही या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे.
तुळसण फाट्यानजीक ओढा शिवारात शैलेश पाटील यांचे दीड एकर उसाचे पीक वाहून गेले आहे. शेतात गुडघाभर माती व वाळूचा थर बसला आहे. सध्या ही शेती वाळवंटासारखी झाली असून येथे ऊसशेती होती, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. याशिवाय ज्ञानदेव शेवाळे व त्यांच्या कुटुंबीयांची विहीर पूर्णत: पुरात वाहून गेली असून शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. वैभव पाटील यांच्या सात ते आठ गुंठे उसाच्या क्षेत्रातून नदीने प्रवाह काढल्याने त्यांची जमीन व विद्युत पंप, पाईपलाईन वाहून गेली आहे. त्यांच्या शेजारी असलेल्या ज्ञानदेव शेवाळे यांची कूपनलिका व पाईपलाईनसह सर्व शेती वाहून गेली. बी. आर. यादव, पांडुरंग शेवाळे, संजय पाटील यांच्या शेतातील ऊस पिकासह संपूर्ण शेती वाहून गेली आहे.
उंडाळे ते तुळसण रस्ता वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली असून या विभागातील पुलांचेही मोठे नुकसान झाले आहे. येळगावहून वाहणाऱ्या दक्षिण मांड नदीने उंडाळे धरणाच्या खालच्या बाजूला पात्र बदलल्याने शेती, विहिरी वाहून जाऊन लाखोंचे नुकसान झाले आहे. या नदीवर उंडाळे येथे असणाऱ्या धरणाच्या सांडव्याची भिंतही वाहून गेली आहे. सुधीर पाटील, मधुकर पाटील, राजेंद्र एकनाथ पाटील, बबन मोहिते, भगवान पवार यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. उंडाळे ते साळशिरंबे रस्ता खचल्याने मोठे खड्डे पडले आहेत.
- चौकट
कालेत पंधरा घरांमध्ये पाणी
काले येथे पंधरा घरांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. देसाई यांच्या नदीकाठावरील पोल्ट्रीमध्ये पाणी शिरून पोल्ट्रीतील तीन हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. टाळगाव, घोगाव येथेही घरात पाणी शिरल्याने चाळीस कुटुंबांना अन्यत्र हलविण्यात आले होते. घोगाव येथे संभाजीनगर-शेवाळेवाडी येथील बंधारा फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले, तर भुरभूशी येथे रस्ता दहा ते पंधरा फूट खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
- चौकट
शेतीसह घरांचे मोठे नुकसान
येळगाव, घोगाव, सवादे, तुळसण, विठ्ठलवाडी, घराळवाडी, येवती, शेवाळेवाडी, गोटेवाडी, म्हासोली, पाटीलवाडी, जिंती, येणपे, चोरमारेवाडी माटेकरवाडी, पाटीलवाडी यासह परिसरात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने हाहाकार उडवला असून शेती, घरांचे नुकसान झाले आहे.
- चौकट
वीज खांब तारांसह गायब
वीज खांबांचे उंंडाळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नदीकाठावरील पन्नासपेक्षा जास्त खांब तारांसह वाहून गेले आहेत. त्याची मोजदाद वीज वितरण कंपनीचे कर्मचारी करीत असून वीजपुरवठा खंडित आहे.
फोटो : २५केआरडी०२
कॅप्शन : भुरभूशी (ता. कऱ्हाड) गुढे-पाचगणी रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.