सातारा : कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील पूरस्थिती कमी होऊ लागली असली तरी अजूनही जनजीवन पूर्वपदावर आलेलं नाही. त्यातच पाऊस पडत असल्याने नागरिकांत पुराची धास्ती कायम आहे. तर कोयना धरणाचे दरवाजे आठ फुटापर्यंत खाली आणल्याने विसर्ग कमी झाला असून पाटणसह तालुक्यातही वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कऱ्हाड, पाटणसह पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर पाटण आणि कऱ्हाड तालुक्याला महापुराने विळखा घातलेला. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने हा विळखा हळूहळू सुटू लागलाय. पण, पाऊस सुरूच असल्याने पुन्हा महापूर येणार का काय ? याची धास्ती कायम आहे. कºहाड शहरातील पूरस्थिती ओसरु लागलीय. रात्री पाऊस कमी होता. पण, गुरूवारी दुपारच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची स्थिती जैसे थे आहे. तर दुकानातील पाणी कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येण्यास आणखी वेळ लागू शकतो.
पाटण तालुक्यात पाऊस सुरूच आहे. पण, पावसाचा जोर ओसरलाय. कोयना धरणाचे दरवाजे बुधवारी रात्री १४ फुटांवर होते. ते गुरुवारी सकाळी ८ फुटापर्यंत खाली आणण्यात आले. धरणात येवा कमी झाल्याने विसर्गही कमी झालाय. सकाळी दहाच्या सुमारास धरणातून ६८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे कोयना नदीतील पाणीपातळी कमी होऊ लागलीय. तर पाटणमध्ये बुधवारी रात्रीपासून वीज गायब झाली असून तालुक्यात अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर पाण्यात गेल्याने आठ दिवसांपासून वीज खंडीत आहे. खंडाळा तालुक्यात ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्याचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलीस व ग्रामस्थ शोध घेत आहेत. सातारा शहरातही पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, अधूनमधून सरी कोसळत आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथे दोन दुचाकीवर झाड कोसळून नुकसान झाले. कास, बामणोली, तापोळा परिसरात भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.