कऱ्हाड : कृष्णा आणि कोयना नदीकाठावर शेकडो गावे वसली आहेत. त्यापैकी ८१ गावांना प्रत्येक वेळी पुराचा फटका बसतो. मात्र, वारंवार घोषणा होऊनही या गावांमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना झालेल्या नाहीत. केवळ पावसाळ्यात संरक्षक भिंतीसह पुनर्वसनाच्या घोषणा केल्या जातात. आणि पावसाबरोबर पूर ओसरताच या घोषणांचाही प्रशासनाला विसर पडतो.
कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांतील नदीकाठावर वसलेल्या अनेक गावांना पुराचा फटका बसतो. पावसाळा सुरू होताच या गावांमध्ये पुराची धास्ती निर्माण होते. सलग दोन वर्षे आलेल्या पुराच्या कटू आठवणी आजही ताज्या आहेत. मात्र, ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पूर आला की संबंधित गावांमध्ये उपाययोजनांचे आडाखे बांधले जातात. आणि पूर ओसरला की उपाययोजनांचा विषयही विस्मृतीत जातो. कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील ८१ गावांना पुराचा सामना करावा लागतो. यंदाही ही गावे पुराच्या भीतीमुळे धास्तावलेली आहेत. मात्र, तरीही संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविल्या गेलेल्या नाहीत.
अनेक कुटुंबांच्या पुनर्वसनासह नदीकाठावरील अतिक्रमणाचा प्रश्नही कायम आहे. पावसाळा आला की, पुनर्वसन, अतिक्रमण, संरक्षक भिंत हे विषय चर्चेत येतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नेते मंडळीही त्या वेळी आश्वासनांची खैरात करतात. मात्र, त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नाही, हे दुर्दैव.
- चौकट
पुरबाधित गावे
कऱ्हाड : ३१
पाटण : ५०
- चौकट
प्रमुख नद्या व उपनद्या
१) पाटण
मुख्य नद्या - कोयना, केरा, मोरणा
उपनद्या - वांग, काफणा, उत्तरमांड, तारळी, काजळी
२) कऱ्हाड
मुख्य नद्या - कोयना, कृष्णा
उपनद्या - दक्षिण मांड, उत्तर मांड, तारळी, वांग
- चौकट
... या गावांना बसतो फटका
१) कऱ्हाड तालुका
कृष्णा : कऱ्हाड शहर, गोटे, कापिल, आटके, जाधवमळा, सयापूर, पाचवडवस्ती, गोळेश्वर, मालखेड, रेठरे खुर्द, दुशेरे, शेरे, वाठार, रेठरे बुद्रूक, कार्वे, कोडोली, पवारमळी, खुबी, गोंदी, खोडशी
कोयना : वारूंजी, तांबवे, म्होप्रे, येरवळे, चचेगाव, पोतले, साजूर
२) पाटण तालुका
कोयना : हेळवाक, पाटण, निसरे, मंद्रुळ हवेली, नावडी, मुळगाव, सांगवड
- चौकट
केवळ घोषणाच, कार्यवाही शून्य!
१) २००५ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कऱ्हाड तालुक्यात नदीकाठावरील गावांना संरक्षक भिंती बांधून देण्याची घोषणा केली होती.
२) २०१९ साली भाजप-शिवसेनेच्या काळातही तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कऱ्हाड शहरासह तालुक्यातील गावांत संरक्षक भिंतीचे अश्वासन दिले होते.
३) पाटण तालुक्यातील नदीकाठच्या घरांच्या पुनर्वसनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याबाबतही काही हालचाली झाल्या नाहीत.
४) कऱ्हाड शहराला संरक्षक भिंतीच्या कामावरून केवळ राजकारण झाल्याने भिंतीचे काम आजअखेर रखडलेले आहे. भिंतही अर्धवटच झाली आहे.
फोटो : १८केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड शहराला आॅगस्ट २०१९ मधील महापुराचा मोठा फटका बसला होता. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या दत्त चौकापर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. (संग्रहित फोटो)
फोटो : १८केआरडी०२
कॅप्शन : प्रतीकात्मक