सणबूर : ढेबेवाडी विभागात पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून नदीकाठच्या गावांना फटका बसला आहे. नदीकाठावरील मालदन गावातील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमधील इमारत पूर्ण पाण्याखाली जावून सर्व दप्तर, संगणक, किचन शेड, बाकडी, पुस्तके, क्रीडा व इतर साहित्य वाहून गेले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मालदन येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल वांग नदीच्या काठावर आहे. नदीला आजपर्यंत अनेकवेळा पुर आला. त्या-त्यावेळी हायस्कूलच्या मैदानावर पाणी आले होते; पण इमारतीला कधीही धोका झाला नव्हता; पण यंदा तीन दिवस आतोनात पाऊस झाल्याने वांग नदीला मोठा पूर आला. त्यामुळे नदीच्या शेजारी असणाऱ्या मराठा हायस्कूलची इमारत पूर्ण पाण्याखाली गेली.
या शाळेतील सर्व कागदपत्रे, किर्द, खतावणी भिजून खराब झाली आहे. तर संगणक रुमधील चौदा संगणक पाण्यात जावून मोठे नुकसान झाले आहे. मुख्य इमारतीला लागूनच किचनच्या दोन खोल्या होत्या. त्या पुराच्या पाण्याने भुईसपाट होवून धान्यासह इतर साहित्य वाहून गेले. कपाटांचेही मोठे नुकसान झाले आहे. शाळेच्या ग्रंथालयातील ३ हजार ६०० पुस्तके भिजून खराब झाली असून काही वाहून गेली आहेत. याबरोबरच क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा साहित्य, नकाशे व साठ बेंचेस वाहून गेले आहेत. शाळेच्या सर्व खोल्यात गाळ साचला असून शाळेचे मोेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.संस्थेचे माजी सहसचिव एस. के. कुंभार, माजी सहसचिव आर. के. भोसले यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी सरपंच भीमराव गायकवाड, माजी सरपंच आबासाहेब काळे, जोतिराज काळे, प्रशांत जंगाणी, प्रमोद ताईगडे, हवालदार तानाजी माने, मुख्याध्यापक एस. पी. तोडसम, एच. के. कुंभार, एस. जे. वाघ, सचिन पाटील, एस. व्ही. पाटील, एच. बी. आतर उपस्थित होते.