म्हसवड : गोंदवलेकर संस्थानच्यावतीने कोरोनाची आपत्ती निवारणासाठी मदतीचा ओघ सुरू असून संस्थानचा दवाखाना कोरोना सेंटरसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच दोनशे बेड आणि आवश्यकतेनुसार कोरडा शिधा प्रशासनाला पुरवणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे.
कोेेरोनाच्या भीषण परिस्थितीत संस्थानने सुरुवातीच्या काळातच पंतप्रधान निधीसाठी पन्नास लाख, मुख्यमंत्री निधीसाठी २५ लाख व ससून रुग्णालयात कोरोना सेंटरसाठी २५ लाख अशी एक कोटी रुपयांची मदत देऊ केली होती. याशिवाय जिल्ह्यातील विविध ठिकाणी गरजू नऊ हजारहून अधिक लोकांना पन्नास लाखाहून अधिक रकमेचा शिधा वाटप केले आहे.
प्रशासनाच्या मागणीनुसार म्हसवड येथील कोरोना सेंटरसाठी गेल्यावर्षी रुग्णवाहिका दिली आहे. दहिवडीत सुरू होत असलेल्या कोरोना सेंटरसाठी दोन दिवसांपूर्वी साठ बेड दिले आहेत. आणखी १४० बेड प्रशासनाकडे देण्यात येतील.