पेट्री : कास पठारावर विविध फुलांचा गालिचा आच्छादला असून, तो परदेशी पर्यटकांना मोहिनी घालत आहे. राज्यासह देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. मिकी माउसचे दर्शन होत असून तेरडा, गेंदचे काही ठिकाणी गालिचे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. पठारावरील विविधरंगी फुलांचे गालिचे असणाऱ्या फुलांच्या गावी अर्थात कास पठारावर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची कुटुंबासमवेत गर्दी होत आहे. कास-महाबळेश्वर राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढऱ्याशुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण आहे. यामुळे ते पर्यटक या ठिकाणी चालत फुलांची पर्वणी अनुभवताना दिसतात. पठारावर सतत पर्यटकांची रेलचेल सुरू असून, ठिकठिकाणी गाईड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांचे व वनस्पतींसंदर्भात पर्यटकांना मार्गदर्शन करीत आहेत. जिल्ह्याला लाभलेले कास पठार हे निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत. पावसाने उघडीप दिली असून, फुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याचे सदस्य ज्ञानेश्वर आखाडे यानी सांगितले.
कोट :
कास पठार आपल्यासाठी जणू स्वर्गच होय. येथील पर्वणीचा स्वानुभव कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आहे. येथील पर्यावरणाला, नाजूक - दुर्मीळ फुलांना कोणतीही हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. येथील पर्यटनस्थळाचा वारसा जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
- विश्वराज पवार,
पर्यटक, पुणे
कोट :
कास पठारावरील विविधरंगी व दुर्मीळ फुले पाहत असताना पायदळी तुडवली जाणार नाहीत याची पर्यटकांनी काळजी घेऊन येथील निसर्गसौंदर्याचा वारसा जपावा.
- मारुती चिकणे,
अध्यक्ष, कास पठार कार्यकारिणी समिती
चौकट :
तेरडा बहरात
सह्याद्रीच्या रांगांत अनेक महत्त्वाच्या भागात सप्टेंबर म्हणजेच गौरी-गणपती सणाच्या आसपास ही वनस्पती उगवते. हिला तेरडा किंवा गौरीची फुले म्हणतात. या भागात पावसाचे प्रमाण जास्त, वारा जास्त, हवा थंड या सर्व बाबी आढळत असल्यामुळे हा तेरडा जास्त उंच वाढत नाही. असा तो सडा भागातील लावी जातीचा जांभळा तेरडा आहे. याचा पंधरा ते वीस दिवस दिनक्रम सुरू राहतो. जांभळ्या तेरड्याने पठार व इतर सडे उठून दिसतात.
चौकट
पठारावरील गेंद, सीतेची आसवे, तेरडा, सोनकी, अबोलीमा, अभाळी, नभाळी, स्मितिया, मंजिरी, चवर, टुथब्रश, कापरू, पंद, भुईचक्र यासारखी चाळीस ते पंचेचाळीस प्रकारची फुले दर्शन देत आहेत. काही ठिकाणी लाल, पांढरा, जांभळा, निळा - रंगीबेरंगी गालिचे दिसू लागले आहेत.
फोटो
कास पुष्प पठार विविधरंगी दुर्मीळ फुलांनी नटले असून, बहुतांशी ठिकाणी गालिचे दिसत आहेत. गेंद, सीतेची आसवे, स्मितिया, तेरडा या एकत्रित फुलांचा पांढरा, लाल, निळा, पिवळा रंग असे संमिश्र गालिचे पर्यटकांचे लक्ष वेधत आहेत. (छाया : सागर चव्हाण)