खंडाळा : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव आणि महात्मा फुले यांचे जन्मगाव कटगुण ही दोन्ही ठिकाणे आमच्यासाठी श्रद्धास्थाने आहेत. फुले दाम्पत्य ही देशाची संपत्ती असून, सक्षम समाजासाठी त्यांच्या विचारांची कास धरूया,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा व नायगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला रामराजे नाईक-निंबाळकर, जलसंधारण मंत्री शिंदे, पालकमंत्री शिवतारे यांनी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. रामराजे म्हणाले, ‘महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ब्रिटिशांच्या राजवटीत मांडलेले विचार क्रांतिकारी होते. पुण्यासारख्या तत्कालीन कर्मठ विचारांच्या समाजात फुले दाम्पत्यांनी क्रांतिकारक पाऊल उचलले. त्यांचे हेच विचार पुढच्या पिढीपर्यंत गेले पाहिजेत. त्यासाठी समग्र फुले वाड.मय वाचले पाहिजे. महिला जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. ज्या हिंमतीने सावित्रीबाई फुले क्रांतिकारी विचाराने बाहेर पडल्या, तीच हिंमत महिलांनी बाळगली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने महिलांना स्थान मिळेल.’ यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, उपसभापती सारिका माने, स्वाती बरदाडे, नामदेवराव मोहिते आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विजेत्या विद्यार्थिनी, आयएसओ मानांकन मिळालेल्या प्राथमिक शाळा यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. यावेळी समता परिषद कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, बापूसो भुजबळ, विशाखा भुजबळ, शेफाजी भुजबळ, नामदेव राऊत, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महिला बालकल्याण सभापती वैशाली फडतरे, समाजकल्याण सभापती सुरेखा शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके, स्वाती बरदाडे, सभापती नितीन भरगुडे-पाटील, उपसभापती सारिका माने, शिक्षणाधिकारी देवीदास कुलाळ, पुनिता गुरव, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार शिवाजी तळपे, गटविकास अधिकारी दीपा बापट, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सरपंच मनोज नेवसे यांनी प्रास्ताविक केले. सभापती नितीन भरगुडे-पाटील यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी प्रयत्नशील : राम शिंदे मंत्री राम शिंदे म्हणाले, ‘नायगाव हे प्रेरणास्थान आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मांडलेले आदर्श विचार अंगीकारणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. नायगावच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. १ कोटी ८६ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. सावित्रीबार्इंच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी नायगाव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना उत्तम रितीने शेती करता यावी, यासाठी जलसंधारणाची सर्व कामे मार्गी लावली जातील,’ असेही ते म्हणाले. साताबाऱ्यावर महिलांचे नाव.. जमीनीला पतीबरोबर सहहिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव नोंदविण्याबाबतचा ‘लक्ष्मी मुक्तीचा’ शासकीय अध्यादेश जारी झाला आहे. यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साताबाऱ्याला सहहिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव लावण्यास लेखी परवानगरी देऊन सावित्रींच्या लेकींचा सम्मान केला. सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांच्या माध्यमातून सातबाऱ्यावर नाव लागलेल्या महिलांना नायगाव येथील कार्यक्रमात सातबाऱ्याचे वाटप करण्यात आले.
फुले दाम्पत्याच्या विचारातूनच सक्षम समाज घडेल
By admin | Published: January 03, 2017 11:22 PM