प्रमोद सुकरेकराड : कराड येथील विमानतळरावर दमानिया एअरवेजच्यावतीने येत्या महिनाभरात फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार आहे. त्याची सध्या तयारी सुरू असून प्रशिक्षणासाठीची तीन विमाने देखील कराड विमानतळावर दाखल झाली आहेत. आणखी दोन विमाने लवकरच येणार असल्याचे खात्रीपूर्वक समजते. मुंबई, पुणे, बारामती, धुळेनंतर ही सुविधा कराडमध्ये उपलब्ध होत आहे. कराड विमानतळाचा वाणिज्यिक वापर व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले. दमानिया एअरवेजने महाराष्ट्र शासनाशी करार करून फ्लाईंग अकॅडमी सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली. फेब्रुवारी २०१९ मध्ये परवेज दमानिया यांनी कराड विमानतळाची पाहणी करून फ्लाईंग अकॅडमीची घोषणा केली होती. त्यानंतर सुविधा उपलब्ध केल्या. त्यामुळे प्रशिक्षणासाठी कराड विमानतळ सज्ज झाले आहे. प्रशिक्षणासाठी एकूण पाच विमाने या अकॅडमीत असणार आहेत. यातील सेन्सा १७२ही दोन विमाने तर सेन्सा १५२ हे एक विमान येथील विमानतळावर दाखल झाले आहे. यातील दोन विमाने दोन सीटची तर एक विमान चार सीटचे आहे. आणखी एक सहा आसनी विमान व पाईपर विमान दाखल होणार आहे. ही विमाने ठेवण्यासाठी व मेन्टेनन्ससाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगरची निर्मिती करण्यात आली आहे. याचठिकाणी टेक्निकल स्टाफ काम करणार आहे.
एकावेळी ५० विद्यार्थी घेणार प्रशिक्षणया अकॅडमीचे बेस इनचार्ज म्हणून पंकज पाटील हे काम पाहात आहेत. एका वर्षात स्थानिकांसह देशभरातील सुमारे ५० विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेतील. त्यांचा कालावधी २ वर्षे इतका आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
मुंबई, पुण्यानंतर आता कराडात सोय पुणे, बारामती नंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह दक्षिण महाराष्ट्रात फ्लाईंग स्कूल नव्हते. मात्र आता कराड विमानतळावर प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होत आहे. या माध्यमातून रोजगार निर्मितीसह स्थानिक पातळीवर आर्थिक विकासाला देखील मोठी चालना मिळणार आहे.