राहिद सय्यद -- लोणंद --लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा एकीकडे बिगुल वाजला असताना व उमेदवार प्रचारामध्ये गुंतले असताना दुसरीकडे लोणंद प्रभाग क्रमांक १, २ व ३ ला अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रभागांकडे नगरपंचायत प्रशासकांबरोबर इच्छुक उमेदवारांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत मतदार व रहिवाशांनी व्यक्त केले.लोणंद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथमच नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र हे होत असताना येथील प्रभागांना विविध समस्यांनी ग्रासले असल्याचे चित्र याठिकाणी दिसून येत आहे. यामध्ये प्रभाग क्र. १ मध्ये प्रामुख्याने पाटील वस्ती, आदर्शनगर, बेलाचा मळा, शिंदे वस्ती, यादव वस्ती, नेवसे वस्ती, गणेशनगर, औद्योगिक वसाहत, भिसे वस्ती या परिसराचा समावेश होतो. या प्रभागाची लोकसंख्या एक हजार १७९ असून, मतदार संख्या ८८५ आहे. या प्रभागामध्ये रस्ते, गटारे, पाण्याची समस्या या मूलभूत सुविधांच्या समस्येव्यतिरिक्त सर्वात मुख्य समस्या औद्योगिकीकरणाची आहे. या परिसरातील कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, येथील नागरिकांबरोबर शेतीवरही परिणाम जाणवू लागल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठेचा बनलेला शिरवळ-लोणंद महामार्गामध्ये येथील रहिवाशांच्या जमिनी संपादित झाले असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.त्याचप्रमाणे प्रभाग क्र. २ मध्ये पंजाब कॉलनी, झारेकरी वसाहत, सूर्या हॉस्पिटल परिसर ते अहिल्यादेवी स्मारक परिसर असा भाग येतो. या प्रभागात ६५६ इतके मतदार आहे. याठिकाणी प्रामुख्याने लोणंद-फलटण रेल्वे रुळावरून जाणारा अपूर्ण असलेल्या पुलाचे कामाबरोबर उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. या उड्डाणपुलाचा फटका स्मारकालाही बसण्याची शक्तता आहे.त्याचप्रमाणे प्रभाग क्र. ३ मध्ये मोरयानगर, एमएसईबी कॉलनी, बिरोबा नगर, काळवट मळा, शेळके वस्ती, इंदिरानगर येथील काही भाग असा परिसर येतो. या प्रभागाची लोकसंख्या १०९३ इतकी असून, एकूण मतदार ८११ आहे. या प्रभागात अंतर्गत रस्ते, गटारे नसल्याने सांडपाणी व कचऱ्याचा गंभीर प्रश्न जैसे थे आहे. एकंदर लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे तिन्ही प्रभागांतील मूलभूत समस्यांना प्राधान्य दिल्यास विकास होणार आहे.स्मशानभूमीचा प्रश्न जुनाच लोणंद नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये मूलभूत सुविधांबरोबर स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित पडला आहे. लोणंद नगरपंचायतीने प्रथम पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नागरिकांना आठ-आठ दिवस पाणी साठवणूक करावी लागते. पाटील वस्ती ते शिरवळ नाका येथील अंतर्गत रस्त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.- हणमंत बुनगे, नागरिक (प्रभाग क्र.१)या प्रभागात पाणी अनियमितता, कचऱ्याची विल्हेवाट, गटारे या मूलभूत सुविधांचा अभाव असून, याठिकाणी आरोग्य कर्मचारी फिरकतही नाही. मूलभूत सुविधा प्राधान्यक्रमाने सोडविणे गरजेचे आहे. - संगीता भाटिया, नागरिक (प्रभाग क्र. २) लोणंदच्या प्रभाग क्र. ३ मध्ये अंतर्गत रस्ते होणे गरजेचे आहे. याठिकाणी गटारे, सांडपाणी तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्नही अजूनही सुटला नाही. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.- राजेंद्र राऊत, नागरिक (प्रभाग क्र. ३)
उड्डाणपूल हवेत अन् रस्ते खड्ड्यात !
By admin | Published: March 27, 2016 11:24 PM