कऱ्हाड : शेंद्रे ते कागल महामार्गावर नागठाणे व माजगाव फाटा येथे उड्डाणपूल होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने येथे पूल प्रस्तावित केल्याने अनेक दिवसापासूनच्या मागणीला यश आले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने गरजेचे बनलेल्या या उड्डाणपुलामुळे गैरसोय टळणार असून, अपघातालाही आळा बसणार आहे.
महामार्गावरील नागठाणे व माजगाव फाटा येथे होत असलेल्या वाहतुकीच्या गैरसोयीबद्दल व स्थानिकांच्या मागणीनुसार येथे उड्डाणपूल करण्यात यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली होती. त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या मागणीवरून नागठाणे व माजगाव फाटा येथे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण विभागाने खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्राद्वारे दिली.
नागठाणे हे परिसरातील मोठ्या बाजारपेठेचे ठिकाण असल्याने, येथे आसपासच्या सुमारे २० ते २५ गावांचा संपर्क येतो. याशिवाय नागठाणे गावचा आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो. व्यापाराचे प्रमुख ठिकाण असल्याने परिसरासह इतर तालुक्यातील व्यापारी व नागरिक येथे खरेदी-विक्री करण्यासाठी येत असतात. मात्र, येथून सातारा ते कागल हा महामार्ग जात असल्याने नागरिकांना महामार्ग ओलांडून जावे लागते. त्यामुळे येथे वारंवार वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो, तर अनेकदा अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच महामार्गावरील सततच्या वाहतुकीमुळे स्थानिक वाहनधारक व नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. तशीच परिस्थिती माजगाव फाटा या ठिकाणीही असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली होती.
या मागणीची दखल घेत, खासदार श्रीनिवास पाटील यांनी नागठाणे व माजगाव फाटा येथे उड्डाणपूल व्हावा, ही मागणी करून तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार, येथे अंडरपास उड्डाणपूल मंजूर झाल्याने, स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.