सातारा : येथील पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवराज चौकातील उड्डाणपुलाला बुधवारी सायंकाळी अचानक भेग पडल्याने मोठी खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी उड्डाणपुलावरून वाहतूक बंद करून सेवा रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली.साता-यातून कोल्हापूरकडे जाणा-या शिवराज चौकात नवा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या नव्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री आठच्या सुमारास पुलाला अचानक भेग पडली. त्यामधून वाळू खाली पडत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने शिवराज चौकात धाव घेतली. उड्डाणपुलावरून वाहन गेल्यानंतर हादºयाने वाळू खाली पडत होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी वरिष्ठ अधिकाºयांशी बोलल्यानंतर उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. महामार्गाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेटस लावून वाहतूक अडविण्यात आली. कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहने सेवा रस्त्यावरून सातारा शहरात वळविण्यात आली. तर पुणे बाजूकडून आलेली वाहने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून पुढे सेवारस्त्याने खिंडवाडीपर्यंत सुरू ठेवण्यात आली.सेवा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सुमारे ५० पोलिस तैनात करण्यात आले होते. गुरुवारी दुपारपर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात येणार नाही. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांनी उड्डाणपूल वाहतुकीस योग्य असल्याचा अहवाल दिल्याशिवाय वाहतूक सुरू न ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
पुणे-बेंगळूर महामार्गावरील उड्डाणपुलाला पडली भेग, सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक वळविली सर्व्हिस मार्गाने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 10:30 PM